मुंबई : उन्हाळी सुट्ट्या, लग्नसमारंभ यानिमित्त्याने रेल्वेगाड्यांनी बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली असून, नियमित रेल्वेगाड्यांसह विशेष रेल्वेगाड्यांची प्रतीक्षा यादी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांना आरक्षित तिकिटे न मिळाल्याने, त्यांना रेल्वे प्रवासापासून वंचित राहावे लागते. अनेकदा आरक्षित तिकिटे मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनेक दलाल रेल्वे परिसरात फिरत असून, प्रवाशांची आर्थिक लूट केली जाते. या दलालावर अंकुश आणण्यासाठी मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) विविध मोहिमा सुरू आहेत. नुकताच, या मोहिमेत मनोज कुमार (५४) या तिकीट दलालाला पकडले आहे. त्याच्याकडून ३८ हजारांहून अधिक रुपयांची १४ इ-तिकिटे ताब्यात घेतली आहेत.
मध्य रेल्वेच्या आरपीएफने आरक्षित रेल्वे तिकिटांच्या काळाबाजार रोखण्यासाठी मोहीम आखली आहे. तसेच सायबर सेलकडून विविध माहितीच्या आधारे आरपीएफ पथक छापे टाकत आहे. २७ एप्रिल रोजी घाटकोपर आरपीएफ अधिकाऱ्यांना दलालाविषयी माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी डोंबिवली येथे राहणारा मनोज कुमार याला अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून एक मोबाइल आणि ३८,६४१ रुपयांची १४ इ-तिकिटे जप्त केली आहेत.
प्रवाशांना रेल्वे स्थानकात अनधिकृत फेरीवाला, संशयित व्यक्ती आणि तिकीट दलाल दिसून आल्यास, त्यांनी ९००४४४२७३३ या व्हॉटस्अॅप क्रमांकावर संदेश, फोटो पाठवू शकतात. २४/७ या क्रमांक चालू राहणार आहे. प्रवाशांनी तक्रार दाखल केल्यानंतर, मध्य रेल्वेच्या नियंत्रण कक्षाद्वारे, संबंधित रेल्वे स्थानकातील आरपीएफ कर्मचाऱ्याद्वारे त्याला पकडण्यात येईल. तसेच त्याठिकाणी अनधिकृत फेरीवाला, संशयित व्यक्ती आणि तिकीट दलाल नसतील. तर, त्याचा शोध घेऊन पुढील कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.