वीजवितरण यंत्रणा सुधारण्यासाठी बेस्टला केंद्राकडून ३९५ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. वित्तीय कंपन्यांकडून कमी कालावधी व जास्त व्याजदराचे कर्ज घेण्याऐवजी या मदतीमुळे बेस्टवरील इतर कर्जाचा भार कमी होऊन त्याचा अप्रत्यक्ष लाभ ग्राहकांना मिळेल.
हे कर्ज घेण्यासाठी बेस्ट समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बेस्टवर आजमितीला ३,०७० कोटी रुपयांचे कर्ज आहे. या कर्जात आणखी ३९५ कोटी रुपयांच्या कर्जाची भर पडणार आहे. बेस्टच्या भांडवली मूल्याच्या तुलनेत हे कर्ज मर्यादेत बसणारे असले तरी बेस्टची एकूण आर्थिक आघाडी पाहता या कर्जामुळे उपक्रमाच्या हलाखीत भर पडणार नाही, याची काळजी घ्यायला हवी, असे बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी सांगितले. वीज वितरणाचा दर्जा सुधारण्यासाठी बेस्टने ११ प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यासाठी सुमारे साडेपाचशे कोटी रुपयांचा निधी लागेल. त्यातील ७० टक्के रक्कम या कर्जातून उपलब्ध होईल. हे कर्ज घेतल्यानंतर त्याबाबतचा अहवाल दरवर्षी समितीसमोर आणला जाईल, असे बेस्टचे महाव्यवस्थापक ओ. पी. गुप्ता म्हणाले.

Story img Loader