मुंबई : तब्बल ६३ तासांचा जम्बो ब्लॉक घेऊन मध्य रेल्वेवरील सीएसएमटी स्थानकात बसविण्यात आलेली इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणा आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी अकार्यक्षम ठरली. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणेतील त्रुटीमुळे मध्य रेल्वेवरील लोकल सेवा विस्कळीत झाली आणि हजारो प्रवाशांना त्याचा फटका बसला. अचानक जाहीर केलेला जम्बो ब्लॉकमुळे आयत्या वेळी करावे लागलेले नियोजन आणि ब्लॉकनंतर पहिल्याच दिवशी कोलमडलेले लोकलचे वेळापत्रक यामुळे प्रवासी प्रचंड संतप्त झाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विलंबाने धावणाऱ्या लोकलमधून प्रवास करताना प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. मध्ये रेल्वेवर लोकल सेवेचा खेळखंडोबा सुरू असतानाच पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा कोलमडली आणि प्रवाशांच्या संतापात भर पडली. सीएसएमटी स्थानकातील फलाट क्रमांक १० – ११ च्या विस्तारीकरणासाठी रेल्वेने शुक्रवार मध्यरात्रीपासून जम्बो ब्लॉक घेतला होता. जम्बो ब्लॉक नियोजित वेळेनुसार रविवारी दुपारी संपला. जम्बो ब्लॉक काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची प्रचंड धावपळ झाली होती. जम्बो ब्लॉक संपुष्टात आल्यामुळे सोमवारी वेळेत कार्यालयात पोहोचता येईल अशी कर्मचाऱ्यांना आशा होती. मात्र त्यांचा अपेक्षाभंग झाला. बहुसंख्य नागरिक कामावर जाण्यासाठी सोमवारी पहाटे घराबाहेर पडले. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे सोमवार पहाटेपासूनच मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली होती. कुर्ला स्थानकानंतर लोकलचा वेग मंदावत होता. कुर्ला स्थानकावरून पुढे गेलेल्या लोकल गाड्यांची एकामागे एक रांग लागली होती.

हेही वाचा – रिक्षातून जाणाऱ्या महिलेचा मोबाइल हिसकावून चोरांचा पोबारा

मुख्य मार्गावरील लोकल सुमारे ३० ते ३५ मिनिटे विलंबाने धावत होत्या. दरम्यान, संध्याकाळीही अशीच परिस्थिती होती. त्यामुळे लोकलमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणा कार्यान्वित होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना आणखी काही दिवस लेटलतीफ कारभाराचा त्रास सोसावा लागणार आहे. नवीन यंत्रणा बसविल्यानंतर काही त्रुटी राहून जातात किंवा काही चुका होतात. सीएसएमटी स्थानकात बसविलेल्या इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणेवर अद्याप काम सुरू आहे. सीएसएमटीसारख्या प्रमुख स्थानकातील यंत्रणा मोठी आहे आणि ती स्थिर होण्यासाठी वेळ लागेल. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणेतील दोष आधीपासून लक्षात येत नाहीत, अशी कबुली मध्य रेल्वेतील एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणा बसविण्यात आली आहे. या नवीन यंत्रणेची तपासणी बसवण्यापूर्वी केली जाते. मात्र ही यंत्रणा प्रत्यक्षात कार्यान्वित झाल्यानंतर त्यातील त्रुटी अथवा दोष लक्षात येतात. त्रुटी अथवा दोष दुरुस्त करण्यासाठी तांत्रिक विशेषज्ज्ञांचे पथक काम करीत आहे. लवकरच त्रुटी वा दोष दूर करून लोकलच्या फेऱ्या नियमितपणे सुरू होतील. – डॉ. स्वप्नील निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

हेही वाचा – पाच वर्षांमध्ये २० हजार नागरिक तंबाखूच्या व्यसनातून मुक्त; टाटा रुग्णालयाच्या ‘तंबाखू क्विट लाईन’ उपक्रमाला प्रतिसाद

बोरिवली स्थानकातील केबलची चोरी

मध्य रेल्वेपाठोपाठच सोमवारी पहाटेपासून पश्चिम रेल्वेची वाहतूक कोलमडली होती. बोरिवली स्थानकात सिग्नल यंत्रणेच्या केबलची चोरी झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. बोरिवली स्थानकातील सिग्नल यंत्रणेतील केबल सोमवारी पहाटे तुटल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे फलाट क्रमांक १ आणि २ वरील लोकलची वाहतूक ठप्प झाली होती. प्रवाशांच्या सोयीसाठी फलाट क्रमांक ३, ४, ५, ६, ७ आणि ८ वरून लोकलची सेवा सुरू ठेवण्यात आली. दुरुस्तीअंती सिग्नल यंत्रणा दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कार्यान्वित करण्यात आली. त्यानंतर फलाट क्रमांक १ वरून लोकल सेवा सुरू करण्यात आली. मात्र सोमवारी सकाळी चर्चगेटच्या दिशेने निघालेल्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, या गोंधळामुळे लोकलच्या ४० फेऱ्या रद्द करण्यात आल्या.

मेट्रोची अतिरिक्त ट्रेन सेवा

पश्चिम रेल्वे विलंबाने धावू लागल्यामुळे बोरिवली स्थानक, कुरार आणि राष्ट्रीय उद्यान मेट्रो स्थानकांत प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. परिणामी, महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी अतिरिक्त मेट्रो गाड्या चालविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, मेट्रो २ ए आणि मेट्रो ७ वर चार अतिरिक्त मेट्रो ट्रेन चालविण्यात आल्या.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central western railway collapsed fault in new electronic interlocking system at csmt station mumbai print news ssb