वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी या वर्षीपासून प्रथमच होऊ घातलेली ‘नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट’ (नीट) ही सामाईक प्रवेश परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, औरंगाबाद आदी केवळ सहाच प्रमुख शहरांमध्ये होणार असल्याने राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागणार आहे. त्यातच राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने होमिओपॅथी, आयुर्वेदसह ११ आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचे ओझेही ‘नीट’च्या माथी मारले आहे.
नीटसाठी ‘केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा’ने ३० नोव्हेंबरपासून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली. मात्र, यात महाराष्ट्रासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक आणि कोल्हापूर या सहा शहरांमध्येच परीक्षा केंद्रे असणार आहेत. या शहरांचे कोड क्रमांक सीबीएसईने दिले आहेत. परीक्षा केंद्रासाठी विद्यार्थ्यांना केवळ या सहा शहरांपैकी त्यातल्या त्यात जे सोयीचे असेल त्याच शहराचा कोड नंबर द्यायचा आहे. राज्यातून दरवर्षी सुमारे अडीच लाख विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी इच्छुक असतात. त्यातून ५ मे, २०१३ रोजी होणाऱ्या नीट परीक्षेतून राज्यातील २६ एमबीबीएस आणि बीडीएस महाविद्यालये व अभिमत विद्यापीठांच्या जागाही भरण्यात येणार आहेत. त्यातच राज्यातील बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, युनानी आदी सर्व ११ आरोग्य विज्ञानविषयक अभ्यासक्रमांचे प्रवेशही नीटमधूनच करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे, इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातून नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड असेल. इतक्या मोठय़ा संख्येने राज्यातील विद्यार्थी नीट देणार असतील तर ती सहाच शहरांपुरती मर्यादित ठेवून कसे चालेल, असा सवाल औरंगाबादच्या एएसएस आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. अभय पाटकर यांनी केला. डॉ. पाटकर यांनी यासंबंधी सीबीएसईला पत्र लिहिले असून राज्यातील किमान ३५ जिल्ह्यांच्या ठिकाणी परीक्षा केंद्र देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
खासगी महाविद्यालयांचा सवतासुभा
नीटसाठी सीबीएसईने दिलेल्या अधिसूचनेत राज्यातील २६ खासगी महाविद्यालये व अभिमत विद्यापीठांच्या जागाही भरण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या महाविद्यालयांची नावे, जागांची संख्या आदी माहितीही सीबीएसईने जाहीर केली आहेत. राज्यातील खासगी महाविद्यालयांच्या ‘एएमयूपीएमडीसी’ या संघटनेने मात्र स्वत:ची स्वतंत्र ‘असो-सीईटी’ जाहीर करून विद्यार्थ्यांच्या गोंधळात भर टाकली आहे. या परीक्षेसाठी अर्ज मागविण्याची प्रक्रियाही सुरू आहे. या अर्जाची किंमत तब्बल तीन हजार रुपये आहे.
अपुऱ्या परीक्षा केंद्राचा फटका लाखो विद्यार्थ्यांना बसणार?
वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी या वर्षीपासून प्रथमच होऊ घातलेली ‘नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट’ (नीट) ही सामाईक प्रवेश परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, औरंगाबाद आदी केवळ सहाच प्रमुख शहरांमध्ये होणार असल्याने राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागणार आहे.
First published on: 15-12-2012 at 03:54 IST
TOPICSवैद्यकीय प्रवेश परीक्षा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Centre scarcity for medical entrance will effect the student