पाकिस्तानी कलाकारांना येत्या ४८ तासांत भारत सोडून जाण्याचे इशारे देण्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) दुसरा काही उद्योग नसल्याची टीका भाजपने केली आहे. भावना आणि प्राधान्याच्या गोष्टींमध्ये फरक ठेवला पाहिजे. सध्या देशभरात पाकिस्तानविरोधी भावना असून अनेक लोकांना सध्याच्या घडीला पाकिस्तानी लोक भारतीय भूमीवर असणे सहन होणारे नाही. याउलट प्राधान्यक्रमाचा विचार करायचा झाल्यास सरकारने हवाई दल, पोलीस आणि एनएसजी यांच्याशी सहकार्य करून मुंबईला दहशतावादाच्या धोक्यापासून सुरक्षित ठेवण्याची गरज आहे. मात्र, अशावेळी काही राजकीय पक्ष केवळ लक्ष वेधून घेण्याच्या उद्देशाने नाटक करत असतील तर ते दुर्देवाचे आहे. लोकशाहीत कायद्याच्या कक्षेत राहून निषेध व्यक्त करण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. त्यामुळे एखाद्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी कोणी कायदा हातात घेत असेल तर त्यांच्याकडे मुद्द्यांची वानवा असल्याचे अधोरेखित होते, असे भाजपच्या नेत्या शायना एन.सी यांनी सांगितले.
केंद्र सरकार दहशतवाद रोखण्याच्या मुद्द्यावर गंभीर आहे. यासाठी सरकार भारतीय लष्कर, पोलीस आणि एनएसजी एकमेकांना सहकार्य करत आहेत. त्यामुळे एखादा राजकीय पक्ष स्वत:चे राजकीय अस्तित्त्व दाखविण्यासाठी सनसनाटी वक्तव्ये करत असेल तर आम्ही त्याच्याकडे लक्ष देणार नाही, असे शायना एन.सी यांनी म्हटले.
मनसेने काल पाकिस्तानी कलाकारांना येत्या ४८ तासांत भारत सोडून जाण्यास सांगितले होते. पाकिस्तानातील अनेक कलाकार विविध कार्यक्रमांसाठी सध्या मुंबईत आहेत. त्यांनी ४८ तासांत देश सोडला नाही तर मनसे आपल्या स्टाईलने त्यांना पळवून लावेल असा इशारा मनसेच्या चित्रपट सेना प्रमुख अमेय खोपकर यांनी दिला होता. पाकिस्तानचे काही कलाकार मुंबईत चित्रिकरणासाठी आले आहेत. या कलाकारांनी ४८ तासांत मुंबई न सोडल्यास चित्रिकरण स्थळी जाऊन त्यांना पळवून लावू, असे अमेय खोपकर यांनी म्हटले होते.
मनसेला इशारे देण्याशिवाय दुसरा उद्योग नाही; भाजपची टीका
मनसेने काल पाकिस्तानी कलाकारांना येत्या ४८ तासांत भारत सोडून जाण्यास सांगितले होते.
आणखी वाचा
First published on: 24-09-2016 at 16:05 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Centre serious about combating terrorism not swayed by mns rant bjp