केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर मुंबईकरांसाठी ‘अच्छे दिन’ येत असल्याचे संकेत या दिवाळीत मिळाले असून मध्य रेल्वेने धनत्रयोदशीचे औचित्य साधून तब्बल ४२५ कोटी रुपयांच्या कामांचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनी नियोजित प्रकल्पांपैकी प्राधान्याने पूर्ण करण्याच्या प्रकल्पांची यादी रेल्वे बोर्डाकडे पाठवली असून यात सुरक्षेशी निगडित प्रकल्पांवर भर देण्यात आला आहे.
प्रत्येक रेल्वे अर्थसंकल्पात मुंबईकरांना दुय्यम वागणूक होत असल्याची टीका सातत्याने होत असते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या लोकसभा निवडणूक प्रचार मोहिमेत रेल्वे सुरक्षा, मुंबईची उपनगरीय लोकल सेवा यांना प्राधान्य देण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानुसार रेल्वे बोर्डाने आता मुंबई विभागातील प्रलंबित प्रकल्पांची माहिती मागवली आहे.
सूद यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसह झालेल्या ‘वर्क प्रोग्राम मिटींग’मध्ये प्रलंबित प्रकल्पांची चर्चा केली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक प्रकल्पांना प्राधान्य देण्यात आल्याचे सूद यांनी सांगितले.
प्रकल्प व खर्च
* छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे लांब पल्ल्याच्या २४ डब्यांच्या गाडय़ांसाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढवणे (७१.६२कोटी)
* विद्युतीकरण : जासई-जेएनपीटी (१४.४७ कोटी) पनवेल-पेण-थळ (१०९.६८ कोटी)
* पावसाळ्यातील सिग्नल यंत्रणेतील बिघाडांसाठी ठाणे -कल्याणमध्ये डिजिटल अॅक्सेल काउंटर्स बसवणे (१०.१० कोटी)
* रेल्वे फाटके बंद करून पूल उभारणे (५२.८७ कोटी). या प्रकल्पात दिवा येथील पूलाचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येईल.
* आसनगाव, दिवा, मुंब्रा, भांडूप, मस्जिद, शिवडी आणि दादर या स्थानकांमधील काही पादचारी पुलांची पुन:उभारणी (१५ कोटी)
* सीएसटी, भायखळा, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, डोंबिवली या स्थानकांवर छप्पर उभारणे (५.४ कोटी)
* अन्य कामे -१३० कोटी