मुंबई : कोल्हापूर येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानच्या कणेरी मठात भरविण्यात आलेल्या ‘सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवा’साठी मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्राच्या विकासासाठीचा निधी वळता करण्यात आल्याचे समोर आले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या प्रदर्शनासाठी दोन कोटी रुपये दिले असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार निधी वळविण्यात आल्याची माहिती आहे.
कणेरी मठ येथे नुकताच ‘सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव’ भरविण्यात आला होता. या लोकोसत्वासाठी निधी मिळावा अशी मागणी करणारे पत्र श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान, कणेरी मठ, कोल्हापूर या संस्थेने अनेक सरकारी यंत्रणांना पाठवले होते. त्यानुसार हे पत्र एमएमआरडीएला ११ जानेवारीस मिळाले. त्यानंतर कणेरी मठाने ५० लाखाच्या निधीची मागणी केली होती. दरम्यान हे पत्र प्राप्त मिळण्यापूर्वी एक दिवस, १० जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात सर्व विभागाची एक बैठक घेतली. या बैठकीत कणेरी मठाच्या लोकोत्सवाबाबत चर्चा आणि सादरीकरण झाले. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या लोकोत्सवात सक्रिय सहभाग घेण्याचे आदेश सर्व विभागांना दिले.एमएमआरडीएने या लोकोत्सवासाठी दोन कोटींचा निधी दिला. संबंधित प्रस्ताव कार्योत्तर मंजुरीसाठी एमएमआरडीएच्या बैठकीत ठेवण्यात येणार आहे. मुंबईत पायाभूत सुविधा क्षेत्रातील इतर सरकारी यंत्रणांकडूनही या लोकोत्सवाला निधी देण्यात आल्याचे समजते.
‘जीएसटी’चाही बोजा
एमएमआरडीएने ‘प्रायोजकत्व’ म्हणून दोन कोटी रुपयांचा निधी दिला असला तरी १८ टक्के वस्तू व सेवाकरासह प्रत्यक्षात दोन कोटी ३६ लाख रुपये एमएमआरडीएला द्यावे लागले आहेत. एमएमआरडीएला प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कोटय़वधी रुपयांचे कर्ज काढण्याची वेळ आली आहे. असे असताना दोन कोटी ३६ लाख रुपयांचा मुंबईच्या विकासासाठीचा निधी कोल्हापूरमधील लोकोत्सवासाठी वळता करण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.