मुंबई : देवताच्या नावे मटण दुकानांना प्रमाणपत्र देण्याच्या मंत्री राणे यांच्या घोषणेला जेजुरीच्या मार्तंड देवस्थानाने विरोध दर्शवला आहे. खंडोबाला पुरणपोळीचा नैवेद्य असतो, आमचा देव शाकाहारी असून ‘मल्हार’ नावाने मटण दुकानांना प्रमाणपत्र देऊ नये, अशी विनंती देवस्थानच्या काही सदस्यांनी केली आहे. तर दुसरीकडे या देवस्थानच्या पाच विश्वस्तांनी राणे यांना पाठिंबा दर्शवला आहे.

पुणे जिल्ह्यातील जेजुरीच्या खंडोबाला ‘मल्हार, मार्तंंड म्हटले जाते. राज्यातील बहुजन समाजाचे हे कुलदैवत आहे. हा देव शाकाहारी असला तरी याच्या जागरण गोंधळात बोकड कापले जाते. खंडोबा देवस्थान असलेल्या पुरंदर परिसरात मटणात हलाल किंवा झटका असा भेद नाही. पुणे जिल्ह्यात मात्र हलाल किंवा झटकापेक्षा ‘बोलाई’ मटणाला प्राधान्य असते. हवेली तालुक्यातील वाडेबोलाई या देवीचे भक्त केवळ मेंढीचे मांस खातात. पुणे जिल्ह्यात बोकड की बोल्हाई हा भेद अधिक मानला जातो.

मंत्री राणे यांनी मटण दुकानांना मल्हार प्रमाणपत्र देण्याच्या केलेल्य मागणीला विरोध झाला होता. हिंदू धर्मीयांमध्ये खाटीक समाज मोठ्या संख्येने आहे. हा समाज अनुसूचित जातीमध्ये येतो. राज्यात या समाजाचे दोन आमदार आहेत. अनुसूचित जातींच्या पाेटजातीमध्ये भाजपने दुभंग घडवून आणला आहे. त्यामध्ये बौद्ध विरोधात आणि उर्वरित ५८ अनुसूचित जाती भाजपच्या बाजुने उभ्या राहिल्याचे या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट झाले होते. हिंदू खाटीक समाजाला मल्हार मटण प्रमाणपत्रामुळे लाभ होईल. या समाजातील युवकांना रोजगार लाभेल, असा दावा मंत्री नितेश राणे करत आहेत.

यासदंर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मेंदूला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी कापून रक्ताचा निचरा करून तयार केलेले मांस म्हणजे हलाल मटण होय. तर तलवारीच्या एका झटक्याने धड शिरापेक्षा वेगळे करून तयार केलेले झटका मटण असे म्हणतात. मटणाला झटका म्हटले काय किंवा हलाल म्हटले काय, त्याचा फारसा परिणाम मटणाच्या गुणवत्तेवर होत नाही. मंत्री राणे यांचा हा केवळ प्रसिद्धीचा उद्योग असल्याचा आव्हाड यांचा आरोप आहे.

Story img Loader