लाेकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई: मुलुंड येथील एम. टी. अग्रवाल रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात बोगस डॉक्टर कार्यरत असल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. महानगरपालिकेच्या १६ उपनगरीय रुग्णालयांतील अतिदक्षता विभाग, वैद्यकीय अतिदक्षता विभागांमध्ये बाह्यस्रोतांद्वारे पुरविण्यात येणाऱ्या कंत्राटी डॉक्टरांच्या पदवी व प्रमाणपत्रे तपासण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील आदेश संबंधित रुग्णालयांना देण्यात आले आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमधील अतिदक्षता विभाग कंत्राटी पद्धतीने चालविण्यासाठी विविध संस्थांना देण्यात आले आहेत. मुलुंडमधील एम. टी. अग्रवाल रुग्णालयामधील अतिदक्षता विभागाचे कंत्राट जीवन ज्योत ट्रस्टला देण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी अतिदक्षता विभागामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती.

हेही वाचा… गृहप्रकल्पाची नोंदणी रद्द करण्याची मुभा ही विकासकांसाठी पळवाट! मुंबई ग्राहक पंचायतीचा आरोप

न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर तेथील काही डॉक्टरांची पदवी प्रमाणपत्रे बनावट असल्याचे उघडकीस आले. या प्रकरणाची दखल घेत मुंबई महानगरपालिकेने जीवन ज्योत ट्रस्टसह अन्य संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या अतिदक्षता विभागातील सर्व डॉक्टरांची पदवी प्रमाणपत्रे तपासण्याचा निर्णय घेतला आहे.

२०२२ मध्येही घडली होती घटना

यापूर्वी सांताक्रुझमधील व्ही. एन. देसाई रुग्णालयामध्येही कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या डॉक्टरच्या पदवीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. ऑगस्ट २०२२ मध्ये वैद्यकीय अतिदक्षता विभागामध्ये मृत्यू झालेल्या एका रुग्णांचे मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी विलंब झाला होता. यावरून रुग्णालयामध्ये मोठा वादंग निर्माण झाल्यावर त्याच्या चौकशीमध्ये कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या डॉक्टरची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी नसल्याचे उघडकीस आले. अशा प्रकारच्या डॉक्टरांना सेवेत घेऊ नये, अशा आशयाचे पत्र त्यावेळी महानगरपालिकेने अतिदक्षता विभागामध्ये कंत्राटी पद्धतीने डॉक्टर पुरविणाऱ्या संस्थांना पाठविले होते. मात्र त्यानंतरही संस्थाकडून अतिदक्षता विभागामध्ये बोगस डॉक्टरांची सेवा पुरवून रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Certificates of contract doctors in suburban hospitals will be checked decision of municipal corporation in case of bogus certificate mumbai print news dvr
Show comments