लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : रेल्वेच्या हद्दीत रेल्वे रुळांवर पाणी साचू नये म्हणून यंदा पालिका प्रशासनाने ठाम भूमिका घेतली आहे. रेल्वेच्या हद्दीतील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या कल्व्हर्टच्या सफाईची जबाबदारी पालिकेच्या अभियंत्यांवर टाकण्यात आली आहे. रेल्वेकडून कल्व्हर्ट स्वच्छ करून घ्यावे आणि रेल्वेने न केल्यास ते पालिकेच्या यंत्रणेकडून करून घ्यावे. तसेच कल्व्हर्ट स्वच्छ झाल्याचा अहवाल ३१ मे पर्यंत द्यावा अशी जबाबदारी पर्जन्यजलवाहिन्या विभागातील अधिकाऱ्यांवर टाकण्यात आली आहे.

चर्चगेटपासून ते पश्चिम उपनगरात दहिसरपर्यंत आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ते मुलुंड, मानखुर्द पर्यंतचा रेल्वे रुळांचा भाग मुंबई महापालिकेच्या हद्दीत येतो. या रेल्वे रुळांवर विविध ठिकाणी पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी कल्व्हर्ट आहेत. पावसाळ्यापूर्वी हे नाले साफ करून घ्यावे लागतात. त्याकरीता पालिका दरवर्षी मध्य आणि पश्चिम रेल्वेला याकामासाठी निधी देत असते. मात्र रेल्वेच्या यंत्रणेने हे नाले साफ केले की नाही याची पाहणी करण्याची जबाबदारी यंदा अभियंत्यांवर टाकण्यात आली आहे. हे कल्व्हर्ट साफ झाले नाही तर रेल्वे रुळांवर पाणी तुंबण्याची शक्यता असते. त्यामुळे पालिकेने ही खबरदारी यंदा घेतली आहे.

आणखी वाचा-आशिष शेलार यांनी केली मोगरा आणि इर्ला नाल्याची पाहणी

रेल्वेच्या हद्दीतील या कल्व्हर्टची स्वच्छता ही मनुष्यबळ वापरून करावी लागते. तसेच ही स्वच्छता करण्यासाठी पालिकेच्या यंत्रणेला रेल्वेच्या हद्दीत जाण्यास परवानगी नसते. त्यामुळे रेल्वेने ही स्वच्छता करून घेणे अपेक्षित आहे. मात्र रेल्वेच्या यंत्रणेने स्वच्छता केली की नाही याची पाहणी करण्याची जबाबदारी अभियंत्यांना दिली आहे. रेल्वेने स्वच्छता केली नसेल तर ती करवून घेणे किंवा मग पालिकेच्या यंत्रणेकडून ती करवून घेणे आणि ३१ मे पर्यंत स्वच्छता पूर्ण केल्याचे प्रमाणित करावे, असे आदेश पालिका अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

वांद्रे स्थानक परिसरातील एका कल्व्हर्टची सफाई अद्याप झालेली नसल्यामुळे याबाबत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी उच्च स्तरीय चर्चा सुरू असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

आकडेवारी…

  • पश्चिम रेल्वेच्या हद्दीत चर्चगेट ते दहिसर दरम्यान ४३ कल्व्हर्ट आहेत.
  • मध्य रेल्वेच्या हद्दीत मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर तब्बल ७६ कल्व्हर्ट आहेत.

Story img Loader