मुंबई : राज्यातील कर्करोग बाधितांचा शोध घेऊन वेळेत उपचार व्हावेत, यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. कर्करोगमुक्त महाराष्ट्रासाठी राज्यभरात विशेष अभियान राबविताना ९ ते १४ वयोगटातील मुलींना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग प्रतिबंधात्मक लस देण्याची तसेच सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कर्करोग तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सोमवारी विधानसभेत दिली.
मुंबईसह राज्यात दिवसेंदिवस कर्करोग रुग्णांमध्ये वाढ होत आहे. यासाठी आवश्यक उपचारांसाठी येणारा खर्च अवाक्याबाहेर असून इतर तपासणीसाठी येणारा खर्च हा लाखांचा घरात जात आहे. या पार्श्वभूमीवर वडाळा येथे मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या नव्या रुग्णालयाप्रकरणी कॅप्टन आर. तमिल सेल्वन, आशीष शेलार, यामिनी जाधव, योगेश सागर, वर्षां गायकवाड आदींनी लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला होता. कर्करोग रुग्ण तपासणीसाठी राज्यात चतु:सूत्री कार्यक्रम आखण्यात आला आहे. यासाठी आशा वर्करसह अनेक पथके काम करतात. काही दिवसांपूर्वी राबविण्यात आलेल्या माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानच्या माध्यमातून महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात ६२ हजार ७२९ महिलांमध्ये कर्करोगाचे निदान झाल्याची माहिती सावंत यांनी दिली. तसेच वडाळा येथे कर्करोग रुग्णालय उभारण्यासंदर्भात समिती स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. अखेर या प्रश्नांची गंभीर दखल घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या दालनात सबंधित मंत्री आणि आमदारांची विशेष बैठक आयोजित करण्याची सूचना केली.