मुंबई : सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (एसईबीसी) आणि मागास प्रवर्गातून (ओबीसी) २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षात विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) ६ एप्रिल २०२५ पर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा दिली आहे. प्रवेश प्रक्रियेदरम्यान काही विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या अर्जाच्या पावतीच्या आधारावर प्रवेश निश्चित केले होते. अशा विद्यार्थ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सीईटी कक्षामार्फत २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात राबविलेल्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत एसईबीसी आणि ओबीसी प्रवर्गातून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या अर्जाची पावती प्रवेश घेताना सादर केली होती. या पावतीच्या आधारावर महाविद्यालयांत विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले होते. या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली होती.

काही विद्यार्थ्यांनी विहित कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले. अनेकांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे शक्य झालेले नाही. अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून सीईटी कक्षाने विद्यार्थ्यांना ६ एप्रिल २०२५ पर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा दिली आहे.

अद्याप जात वैधता प्रमाणपत्र मिळालेले नाही अशा विद्यार्थ्यांनी संबंधित जात पडताळणी कार्यालयाशी संपर्क साधावा आणि दिलेल्या मुदतीमध्ये जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून ते ऑनलाइन सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावर अपलोड करावे.

संबंधित संस्था किंवा महाविद्यालयात जमा करावे, त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र संस्थेत किंवा महाविद्यालयात जमा केले आहे, त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र ऑनलाइन अपलोड करण्यात आले आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी, अशा सूचना सीईटी कक्षाकडून करण्यात आल्या आहेत.

सवलत चालू शैक्षणिक वर्षाकरिता

२०२४-२५ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठीच ही सवलत आहे. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी एसईबीसी आणि ओबीसी संवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही सवलत मिळणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेत जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, असेही सीईटी कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cet cell allowed submission of caste validity certificate till april 6 2025 zws