मुंबई : विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना उद्भवणाऱ्या अडचणी व त्यांच्या शंकाचे निरसन करण्यात महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिकारी व कर्मचारी मोलाची भूमिका बजावत असतात. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांच्या शंका दूर करण्यासाठी थेट महाविद्यालांच्या दारी जाऊन प्राचार्य, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी ‘सुसंवाद मेळाव्या’चे आयोजन केले आहे. अमरावती, पश्चिम महाराष्ट्र, पुणे विभाग, खांदेश विभाग, कोकण विभाग व मुंबई विभागामध्ये हे ‘सुसंवाद मेळावे’ होणार आहेत.
विद्यार्थांच्या शंकाचे निरसन व्हावे व त्यांचे प्रवेश सुलभरित्या व्हावेत यासाठी सीईटी कक्षाकडून २५ जून रोजी प्रवेश नियामक प्राधिकरणचे अध्यक्ष जे. पी. डांगे यांच्या अध्यक्षेतेखाली अमरावती येथे पहिला ‘सुसंवाद मेळावा’ पार पडला. या मेळाव्यास विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिकारी व कर्मचारी आदी ३५० जण उपस्थित होते. यावेळी डांगे यांनी उपस्थितांना सामाईक प्रवेश परीक्षा व प्रवेश प्रक्रियेबाबतचे महत्त्व व आवश्यक माहिती देऊन मार्गदर्शन केले. तसेच त्यांना उद््भवलेले अभ्यासक्रमनिहाय प्रश्न व शंकांचे निरसन केले. परीक्षा समन्वयक राजेंद्र लोंढे यांनी तंत्रशिक्षणातील माहिती दिली. कृषी विभागाचे परीक्षा समन्वयक डॉ. मंगेश निकम यांनी एकूणच केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया, टप्पे आदी सविस्तर माहिती दिली. तसेच कृषी अभ्यासक्रमाबाबत माहिती दिली. उच्च शिक्षणाअंतर्गत अभ्यासक्रमांची माहिती उच्च शिक्षण विभागाचे सहायक परीक्षा समन्वयक डॉ. घनश्याम यांनी दिली.
हेही वाचा : मुंबई: चटईक्षेत्रफळाचा अतिरिक्त लाभ मिळालेल्या ११ झोपु योजना अडचणीत!
वैद्यकीय अभ्यासक्रमाबाबत परीक्षा समन्वयक सिद्धेश नर आणि कला शिक्षण विभागाचे परीक्षा समन्वयक डॉ. विजय सकपाळ यांनी कलाविषयक अभ्यासक्रमासंदर्भात माहिती दिली. प्रवेश प्रक्रिया, संस्था व महाविद्यालयांची परिपूर्ण माहिती, अभ्यासक्रम कसे असणार, शैक्षणिक शुल्क, आरक्षण, एनआरआय विद्यार्थ्यांना प्रवेश कसे मिळणार आदी माहितीही यावेळी देण्यात आली. या कार्यक्रमास प्रवेश प्रक्रिया प्राधिकरणचे सदस्य मुरलीधर चांदेकर व कक्ष अधिकारी तुषार शिंदे उपस्थित होते. अमरावती पाठोपाठ आता पुढील ‘सुसंवाद मेळावा’ पश्चिम महाराष्ट्र विभागामध्ये होणार आहे. या विभागातील विविध महाविद्यालयातील प्राचार्य, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.