मुंबई : एमबीए / एमएमएस आणि एमसीए, बी-एचएमसीटी / एम एचएमसीटी इंट्रीग्रेटेड, बी-डिझाईन, एम-एचएमसीटी, विधि पाच वर्ष अभ्यासक्रमांच्या अर्ज नोंदणीला मुदतवाढ दिल्यानंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) बीएड-एमएड या अभ्यासक्रमाच्या अर्ज नोंदणीला मुदतवाढ दिली आहे. विद्यार्थ्यांना १८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज नोंदणी करता येणार आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमांना अधिकाधिक विद्यार्थ्यांना अर्ज करता यावेत, यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात केली. सर्व अभ्यासक्रमांना नोंदणीसाठी एक महिन्यांची मुदत देण्यात आली होती. मात्र विद्यार्थ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळत असल्याने राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने अर्ज नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली. बीएड-एमएड या अभ्यासक्रमाच्या अर्ज नोंदणी प्रक्रियेला ६ जानेवारीपासून सुरूवात करण्यात आली होती. एक महिन्याच्या कालावधीत बीएड-एमएड या अभ्यासक्रमासाठी राज्यभरातून ७०० विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चित केले आहेत.
त्याचप्रमाणे अनेक विद्यार्थ्यांनी फक्त नोंदणी केली आहे. मात्र शुल्क भरून अर्ज निश्चित केलेला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शुल्क भरून अर्ज निश्चिती करण्याची संधी मिळावी, तसेच ज्या विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणी करणे शक्य झाले नाही, अशा विद्यार्थ्यांना अर्ज करता यावा यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने बीएड-एमएड या अभ्यासक्रमासाठी अर्ज नोंदणी करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या अभ्यासक्रमाला अर्ज नोंदणी करण्यासाठी १८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यानंतर पुन्हा अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यात गतवर्षी बीएड-एमएड अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेसाठी राज्यभरातून १ हजार ३६ विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली होती. नोंदणी केलेल्यांपैकी ७७१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.