मुंबई : विधि ५ वर्ष अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेमधील प्रश्नांसंदर्भात विद्यार्थ्यांना असलेली शंका दूर करण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने संकेतस्थळावर प्रश्न आणि उत्तर तालिका उपलब्ध करून दिल्या आहेत. यावर विद्यार्थ्यांना ६ ते ८ जूनदरम्यान आक्षेप नोंदवण्यासाठी मुदत दिली आहे. या वर्षापासून सर्व अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील प्रश्नांसंदर्भात प्रथमच आक्षेप नोंदवण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी विधि पाच वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा ३० मे २०२४ रोजी घेतली होती.
हेही वाचा >>> या आठवड्यात समुद्रात मोठी भरती; साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळणार, पावसाळ्याच्या चार महिन्यात २२ दिवस मोठ्या भरतीचे
या परीक्षेसाठी राज्यभरातून ७ हजार २८८ विद्यार्थ्यांनी नोंद केली होती. त्यापैकी ६ हजार ७३७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि उत्तर तालिका विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगीन आयडीवर ६ जून २०२४ पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लाॅगिन आयडीवरील प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न आणि उत्तर तालिका यांच्याबाबत शंका असल्यास ८ जूनपर्यंत सीईटी सेलच्या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थी आक्षेप नोंदवू शकतात. प्रत्येक आक्षेपासाठी विद्यार्थ्यांना एक हजार रुपये भरावे लागणार आहेत. विधि पाच वर्ष अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारे आक्षेप नोंदवण्याची संधी प्रथमच सीईटी कक्षाकडून उपलब्ध करण्यात आली आहे. दरम्यान, ई – मेलद्वारे किंवा इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्रश्न आणि उत्तरांसंबंधी नोंदवण्यात आलेले आक्षेप, निवेदन किंवा तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत, अशी माहिती सीईटी कक्षाकडून देण्यात आली.
© The Indian Express (P) Ltd