मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात आलेल्या नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. या परीक्षेला राज्यभरातून ५० हजार २१७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी तीन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण मिळाले आहेत. दोन विद्यार्थी नागपूरचे, तर एक विद्यार्थी जळगावमधील आहे. दरम्यान, राज्यामध्ये नर्सिंगची फक्त पाचच सरकारी महाविद्यालये असून या महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी चुरस लागण्याची चिन्हे आहेत.
गतवर्षीपासून बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यंदा राज्यभरातून तब्बल ५८ हजार ६३५ अर्ज आले होते. यामध्ये सर्वाधिक ५ हजार ९३१ अर्ज नागपूरमधून आले होते. बीएस्सी नर्सिंग सीईटी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ५० हजार २१७ विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा दिली. यामध्ये ३७ हजार ५२४ मुली, तर १२ हजार ६९१ मुलांचा समावेश होता.
हेही वाचा…एटीएसच्या प्रमुखपदी नवल बजाज यांची नियुक्ती
तसेच दोन तृतीयपंथीयांनी ही परीक्षा दिली होती. यामध्ये तीन विद्यार्थिंनींना १०० पर्सेंटाईल गुण मिळाले आहेत. तसेच राज्यातील ३० जिल्ह्यांमधील टॉपरचे गुण हे ९९ पर्सेंटाईलपेक्षा अधिक आहे. राज्यामध्ये बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रम असलेली पाच शासकीय महाविद्यालये असून, त्यामध्ये २५० जागा आहेत. तर खासगी महाविद्यालयात ७ हजार ११० जागा आहेत. त्यामुळे नर्सिंगच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.