लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (सीईटी कक्ष) तंत्रशिक्षण विभागामार्फत विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी सुविधा केंद्र उपलब्ध करण्यात येतात. मात्र केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेदरम्यान काही सुविधा केंद्रांबाबत विद्यार्थी – पालकांकडून येणाऱ्या तक्रारी लक्षात घेता, यंदाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी सुसज्ज सुविधा असलेले सुविधा केंद्र उपलब्ध करण्याचा निर्णय सीईटी कक्षाकडून घेण्यात आला आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सामाईक प्रवेश परीक्षा व त्यावर आधारित केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येतात. त्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या तंत्रशिक्षण विभागामार्फत विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी सुविधा केंद्रे उपलब्ध केली जातात.

आणखी वाचा-मुंबई : विमान कंपनीचा कर्मचारी असल्याचे सांगून लाखोंची फसवणूक

केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेदरम्यान काही सुविधा केंद्रांबाबत विद्यार्थी-पालक यांचेकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षामधील केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेदरम्यान सुविधा केंद्रांसंदर्भात कोणत्याही प्रकारच्या तक्रारी प्राप्त होऊ नये यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने सुसज्ज सुविधा उपलब्ध असणारी सुविधा केंद्रे उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. सुसज्ज सुविधा केंद्रांची निवड करण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने इच्छुक महाविद्यालयांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. ६ जुलैपर्यंत महाविद्यालयांनी सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावरील https://fcreg2024.mahacet.org या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करायची आहे.

सीईटी कक्षाच्या पोर्टलवर नोंदणी केलेल्या महाविद्यालयांमधून सुविधा केंद्रे उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालय निवडण्यात येईल. प्रवेश प्रक्रियेसाठी निवडलेल्या सुविधा केंद्रांनी नियमानुसार प्रक्रियेचे काम योग्यरितीने पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच सुविधा केंद्रांबाबत तक्रार आल्यास संबंधित महाविद्यालयाविरोधात नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती सीईटी कक्षाकडून देण्यात आली.