लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडने (डीआरपीपीएल) धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाच्या भूमिपूजनाचा घाट घातला आहे. भूमिपूजनाबाबतची कोणतीही अधिकृत घोषणा डीआरपीपीएलकडून करण्यात आली नाही. मात्र १२ सप्टेंबर रोजी भूमिपूजन करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. डीआरपीपीएलचा भूमिपूजनाचा घाट उधळून लावण्याचा इशारा धारावी बचाव आंदोलनाने दिला आहे. या भूमिपूजन सोहळ्याला विरोध करण्यासाठी धारावी बचाव आंदोलनाकडून बुधवारी साखळी उपोषण करण्यात येणार आहे. या उपोषणात शेकडो धारावीकर सहभागी होणार असून यावेळी स्थानिक खासदार अनिल देसाई आणि खासदार वर्षा गायकवाड उपस्थित राहणार आहेत.
धारावी पुनर्विकासेच कंत्राट अदानी समुहाला देण्यात आले आहे. डीआरपीपीएलच्या माध्यमातून हा पुनर्विकास मार्गी लावण्यात येणार आहे. पुनर्विकासाचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. पण अद्याप त्यास मान्यता नाही. रहिवाशांच्या पात्रता निश्चितेचे काम सध्या सुरू असून हे काम मार्च २०२५ मध्ये पूर्ण होणार आहे. असे असताना धारावी पुनर्विकासाचे भूमिपूजन करण्याचा घाट डीआरपीपीएलने, प्रामुख्याने अदानी समुहाने घातल्याचा आरोप धारावी बचाव आंदोलनाचे बाबुराव माने यांनी केला आहे. माटुंग्यातील आरपीएफ मैदानावर १२ सप्टेंबर रोजी सकाळी भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे समजते. सर्व धारावीकरांना धारावीतच घरे द्यावी, झोपडपट्टीवासियांना ५०० चौरस फुटांची घर द्यावी यासह अनेक मागण्याही अद्याप मान्य झालेल्या नाहीत. असे असताना भूमिपूजन कसे काय करणार, असा सवालही त्यांनी केला आहे.
हेही वाचा >>>प्रसिद्ध चित्रकार एस.एच. रझा यांच्या चित्राची चोरी; अडीच कोटी रुपये किंमतीच्या चित्राच्या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल
धारावी पुनर्विकासाच्या भूमिपूजनाला धारावीकरांचा विरोध असून हे भूमिपुजन म्हणजे धारावीकरांची फसवणूक असल्याचा आरोप धारावी बचाव आंदोलनाने केला आहे. त्यामुळे भूमिपूजनाचा हा सोहळा धारावीकर होऊ देणार नाहीत, हा सोहळा उधळून लावण्यात येईल, असा इशारा धारावी बचाव आंदोलनाने केला आहे. दरम्यान, या सोहळ्याच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी १० वाजता मांटुंगा लेबर कॅम्प येथे धारावी बचाव आंदोलनाकडून साखळी उपोषण करण्यात येणार आहे. तर गुरुवारी भूमिपूजन उधळून लावण्यात येईल, असा इशारा माने यांनी दिला. महत्त्वाचे म्हणजे दडपशाहीचा वापर करत भूमिपूजन झालेच, तर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही धारावी बचाव आंदोलनाकडून देण्यात आला आहे.
© The Indian Express (P) Ltd