सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ांत सातत्याने सक्रिय असलेल्या ‘टॉप-२०’ चोरांची यादी ठाणे पोलिसांनी तयार केली असून या चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी ही यादी सर्वच गुन्हे अन्वेषण शाखेच्या विभागांसह पोलीस ठाण्यांमध्ये पाठविण्यात आली आहे. सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ांना पायबंद बसावा आणि या चोरटय़ांवर पोलिसांचा वचक राहावा, यासाठी ठाणे पोलिसांनी अशा स्वरूपाची यादी तयार केली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, बदलापूर आणि अंबरनाथ आदी शहरांमध्ये सोनसाखळी चोरांचा उपद्रव गेल्वाढला असून या घटनांमुळे महिलांच्या दागिन्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी ठाणे परिसरात सोनसाखळी चोरटय़ांनी एका महिलेच्या गळ्यातील दागिने खेचण्याचा प्रयत्न केला. त्यास त्या महिलेने विरोध करताच चोरांनी तिला २५ फुटांपर्यंत फरफटत नेल्याने ती महिला जखमी झाली होती. यापूर्वीही सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे महिला जखमी होण्याबरोबरच त्यांच्या जिवालाही धोका निर्माण होत आहे.
याच पाश्र्वभूमीवर ठाणे पोलिसांनी ‘टॉप-२०’ सोनसाखळी चोरांची यादी तयार केली असून ती संपूर्ण आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांमध्ये पाठविली आहे. याशिवाय, सर्वच गुन्हे अन्वेषण शाखेकडेही पाठविली आहे. या यादीतील सोनसाखळी चोरांना पोलिसांनी अनेकदा अटक केली आहे. मात्र, कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा सोनसाखळी चोरीचा उद्योग सुरूच ठेवला असून त्यांचा अशा गुन्ह्य़ांमध्ये सातत्याने सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे.
यामुळे या चोरांवर पोलिसांचा वचक राहावा आणि सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ांना आळा बसावा, यासाठी ठाणे पोलिसांनी अशा स्वरूपाची यादी तयार केली आहेत, असे सुत्रांनी सांगितले.

Story img Loader