१५०० सिमेंट बंधाऱ्यांचे पुढील आठवडय़ात उद्घाटन
गेल्या वर्षी अपुऱ्या पावसामुळे राज्यातील शेती उत्पन्न घटले होते. यंदा हे उत्पन्न वाढविण्याचे सरकारपुढे मोठे आव्हान असून, पावसाचा अंदाज लक्षात घेता यंदा भातासह अन्नधान्य आणि कडधान्याच्या उत्पन्नात वाढ होईल, असा अंदाज सोमवारी व्यक्त करण्यात आला.  
दुष्काळावर मात करण्यासाठी दीर्घकालीन उपाय म्हणून सरकारने सुमारे १५० कोटी खर्चून १५०० सिमेंटचे बंधारे बांधले असून, येत्या ९ तारखेला या सर्व बंधाऱ्यांचे एकाच वेळी उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामाची राज्यस्तरीय आढावा बैठक पार पडली. यंदा कृषी विकासात १० टक्क्य़ांचा विकास दर गाठण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. गेल्या हंगामात (२०१२-१३) अपुऱ्या पावसाने कृषी उत्पन्नात सरासरी चार टक्के घट झाली होती. यंदा पाऊस चांगला होईल, असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केल्याने कृषी उत्पन्नात वाढ होईल, असा दिलासा कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिला. दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यात यंदा लोकसहभागातून मोठय़ा प्रमाणावर तलावातील गाळ काढण्याचे काम करण्यात आले. हा काढण्यात आलेला गाळ शेतकऱ्यांनी शेतात टाकून जमीन सपाट केली.
दुष्काळावर मात करण्यासाठी दीर्घकालीन उपाय म्हणून १४९७ कॉक्रिटचे बंधारे बांधण्यात आले आहेत. सिमेंटच्या या बंधाऱ्यांमुळे पावसाळ्यात पाण्याची साठवण होण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.