उमाकांत देशपांडे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करता आली नाही, तरी ते शल्य पचवून देवेंद्र फडणवीस कार्यरत राहिले. बिहार, गोवा राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये प्रभारी म्हणून अथक परिश्रम करून भाजपला यश मिळवून दिले. महाविकास आघाडीचे चाणक्य शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्य दिग्गज नेत्यांची ताकद राज्यसभा निवडणुकीत पणाला लागलेली असताना महाविकास आघाडी सरकारच्या प्रयत्नांना खिंडार पाडून फडणवीस यांनी भाजपच्या तिन्ही उमेदवारांना राज्यसभा निवडणुकीत मोठे यश मिळवून दिले. ‘चाणक्य नीती’ने विरोधकांना चीतपट करणारा नेता अशी ओळख निर्माण करीत फडणवीस एकापाठोपाठ एक विजय भाजपला मिळवून देत आहेत.
फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन’ ही आत्मविश्वासाने केलेली घोषणा वल्गना ठरली आणि हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास हिरावून घेतला गेला. अपयश आल्याने ते काही काळ खचले, निराश झाले; पण अपयश पचवून पक्षाने दिलेले काम आणि विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी स्वत:ला झोकून दिले. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून फडणवीस यांना फारसे महत्त्व दिले जात नाही, त्यांच्याबद्दलचा विश्वास कमी झाला आहे, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू राहिल्या, तरी फडणवीस यांनी त्याकडे लक्ष न देता पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडण्यावर भर दिला.
बिहार व गोवा राज्यांत भाजपला यश मिळवून देण्याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही भाजपने फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विजय मिळविला. राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याचा महाविकास आघाडीचा प्रस्ताव धुडकावून लावत फडणवीस यांनी अचूक नियोजन व रणनीती आखून भाजपची विजयी घोडदौड कायम राखली. त्यामुळे त्यांचे पक्षातील वजनही वाढले आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले, नितीन गडकरी व विनोद तावडे राष्ट्रीय राजकारणात असून पंकजा मुंडे विधानसभेत पराभूत झाल्या आहेत. त्यामुळे भाजपमध्ये महाराष्ट्रात फडणवीस यांचा शब्द प्रमाण आहे.
आत्मविश्वास दुणावला
आक्रमक, पण संयमी असलेल्या फडणवीस यांनी सूत्रबद्धपणे नियोजन करून राज्यसभा जिंकली व विधान परिषदेतही गुप्त मतदान असल्याने भाजपचे सहाही उमेदवार जिंकतील, असा आत्मविश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात आता २०२४ पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची राळ उडणार आहे. मुंबईसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्यानंतर लोकसभा व विधानसभा निवडणुका स्वबळावर जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. या विजयाने आत्मविश्वास दुणावलेल्या फडणवीस यांचा शब्द पुढील काळात केंद्रीय नेतृत्वासाठीही महत्त्वाचा राहील आणि त्यांच्यावर राष्ट्रीय राजकारणात मोठय़ा जबाबदाऱ्या सोपविल्या जातील, हेच या निकालाचे फलित आहे.
भाजपला १७ मते अधिक
- फडणवीस यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी रणनीती आखताना बहुजन विकास पक्ष, मनसेसह अपक्षांबरोबर चर्चा केली. महाविकास आघाडी सरकारकडून कामे होत नसल्याने आमदारांची नाराजी असल्याचा राजकीय फायदा त्यांनी उचलला. भाजपचे १०६ आमदार आणि रवी राणांसह काही अपक्ष व छोटय़ा पक्षांची साथ आधीपासूनच आहे.
- बहुजन विकास पक्षासह काही अपक्षांची मते आपल्याला मिळतील, अशी महाविकास आघाडीची अपेक्षा होती; पण महाविकास आघाडीची ९-१० मते गनिमी कावा करून फिरविण्याचे राजकीय कसब फडणवीसांनी दाखविले. त्यामुळे भाजपला पहिल्या पसंतीची १७ मते आपल्या संख्याबळापेक्षा अधिक मिळाली. या निवडणुकीत पसंतिक्रमाचे गणित असते.
- विजयीसाठी जो कोटा ऐन वेळीच्या परिस्थितीनुसार येईल, त्यापेक्षा बरीच अधिक मते पीयूष गोयल आणि डॉ. अनिल बोंडे यांना मिळतील, त्यांची अतिरिक्त आणि भाजप व मित्रपक्षांच्या आमदारांची दुसऱ्या पसंतिक्रमाची मते धनंजय महाडिक यांना मिळतील आणि बाहेरून बेगमी केलेली मते तीनही उमेदवारांमध्ये वाटली जातील, असे नियोजन फडणवीस यांनी विरोधकांना बेसावध ठेवून केले.