अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप असलेल्या डॉक्टर अक्षय अहिरराव याला अटक केली जाण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. गुरुवारी त्याच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार आहे. त्याचा जामीन रद्द झाल्यास त्याला तात्काळ अटक केली जाईल, अशी माहिती माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी दिली.
अहिरराव सेंट जॉर्ज रुग्णालयात कार्यरत असताना ही घटना घडली होती. २२ जून रोजी १४ वर्षांची अल्पवयीन मुलगी उपचारासाठी आली असता डॉ. अहिरराव याने तिचा तपासणीच्या निमित्ताने विनयभंग केला होता. पोलिसांनी सुरुवातीला विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. नंतर बलात्कार आणि बाल लैंगिक शोषण विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर फरारी असलेल्या डॉ. अहिरराव याने सत्र न्यायालयात केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. गुरुवारी (११ जुलै) त्यावर सुनावणी होणार आहे. त्याचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज रद्द झाल्यास तात्काळ अटक केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक जगदाळे यांनी दिली.

Story img Loader