मुंबई : गेले दोन दिवस पावसाने काही भागात विश्रांती घेतली, तर काही भागात रिमझिम सरी कोसळत होत्या. मात्र मंगळवारी पहाटेपासून पावसाने पुन्हा जोर धरला असून पुढील तीन – चार तास मुंबई, ठाणे परिसरात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

जून महिन्याच्या अखेरीस पावसाने दमदार हजेरी लावली आणि त्यानंतर जुलैच्या सुरुवातीला मुंबई आणि उपनगरांत पावसाचा लपंडाव सुरू झाला. मात्र नवी मुंबई आणि आसपासच्या काही भागात जोरदार पाऊस पडत होता. दरम्यान, हवामान खात्याने कोकण, कोल्हापूरसह इतर अन्य जिल्ह्यांना २ ते ५ जुलैदरम्यान अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरु होता. पुणे, मुंबईत संपूर्ण आठवडाभर पावसाचा मुक्काम होता. दरम्यान, ७ जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

हेही वाचा >>>मुंबई: मेट्रो स्थानकांमध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग यंत्र उपलब्ध

२ जुलैपासून मुसळधार पावसाचा नवीन वेग सुरू होण्याची शक्यता असून त्याचा प्रभाव दक्षिण भारतातील काही भागावर होण्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच राज्यातही ४ व ५ जुलै रोजी याचा प्रभाव राहण्याची शक्यता हवामान विभागाच्या पुणे विभागाचे प्रमुख डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून वर्तवली होती.

Story img Loader