मुंबई : घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपस्थळी पदाधिकारी – कार्यकर्त्यांची लगबग सुरू असतानाच मुंबईत शनिवारी रात्री पावसाने जोर धरला. रविवारी सुट्टी असल्यामुळे शनिवारी रात्री अनेक भाविक गणेश दर्शनासाठी घराबाहेर पडलेल्या भाविकांचा पावसामुळे गोंधळ उडाला. मुसळधार पावसामुळे शनिवारी मुंबईतील काही ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक अन्य मार्गाने वळविणे भाग पडले. उपनगरातही मुसळधार पाऊस बरसला. दरम्यान, रविवारी मुंबई शहर आणि उपनगरांत ढगाळ वातावरण राहील आणि मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मुंबई शहराप्रमाणेच पूर्व आणि पश्चिम उपनगरात शनिवारी रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपस्थळी सांस्कृतिक कार्यक्रम ऐन रंगात आलेले असतानाच पावसाने ताल धरला आणि कार्यक्रम आटोपते घ्यावे लागले. तसेच शनिवारी रात्री मोठ्या संख्येने भाविकांनी लालबाग, परळ आणि आसपासच्या भागात गणेश दर्शनासाठी गर्दी केली होती. परंतु पावसामुळे गोंधळ उडाला.
शनिवारी सकाळी १० वाजेपर्यंत ते रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत मुंबईतील वेगवेगळ्या भागात १० ते ८० मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यामुळे मुंबईतील काही सखलभागात पाणी साचले होते. रविवारी सकाळी ६ च्या सुमारास काही वेळ पावसाने विश्रांती घेतली. तर काही ठिकाणी तुरळक सरी बरसतच होत्या. तसेच रविवारी संपूर्ण दिवसभर मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शनिवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत (गेल्या २४ तासांत) सांताक्रूझ येथे ९३.७ मि.मी. आणि कुलाबा येथे ८.३ मि.मी. पावसाची नोंद झाली.
हेही वाचा : ‘मेट्रो २ ब’ प्रकल्पातील मोठा अडथळा दूर ; चिता कॅम्पमधील ४०० झोपड्या हटविल्या
जोरदार पावसामुळे रस्ते वाहतूक मंद
सहारा स्टार हॉटेल, वाकोला जंक्शन येथे पाणी साचल्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. नेताजी पालकर चौक येथे दोन फुटापर्यंत पाणी साचल्याने वाहतुकीसाठी अंधेरी भुयारी मार्ग बंद करण्या आला असून नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.