मुंबई/ठाणे/पालघर : मुंबई शहर, उपनगरे तसेच ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये बुधवारी पहाटे सुरू झालेला पाऊस गुरुवारीही कायम होता. मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले आणि वाहतूक मंदावली. पावसाचा रेल्वेच्या वाहतुकीलाही फटका बसला.हवामान विभागाने आज, शुक्रवारीही अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून मुंबई तसेच ठाण्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई उपनगरांच्या तुलनेत गुरुवारी शहरात पावसाचा जोर अधिक होता. बुधवारी सकाळी ८.३० ते गुरुवारी सकाळी ८.३० या २४ तासांत कुलाबा केंद्रात सरासरी २२३.२ मिमी पावसाची नोंद झाली. याच काळात मुंबई उपनगरांत १४५.१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. गुरुवारी संध्याकाळी पावसाचा जोर काहीसा ओसरला. सकाळी ८.३० ते रात्री ८.३० या वेळेत शहरात (कुलाबा केंद्र) ८९.४ मिमी तर उपनगरांत (सांताक्रूझ केंद्र) ९०.८ मिमी पावसाची नोंद झाली. रात्री पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली. सतत कोसळणाऱ्या पावसाने मुंबईतील अनेक भाग जलमय झाले. यापूर्वी कधीही पाणी साचत नसलेला मरिन लाईन्सचा 1परिसरही जलमय झाला. अतिवृष्टीचा फटका कांदिवली ते दहिसर भागाला अधिक बसला. अनेक भागांत रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला.
ठाण्याला पावसाने झोडपले
ठाणे जिल्ह्याच्या बहुतांश भागांत गुरुवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाल्याने सखल भागांत पाणी साचले. महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस अंबरनाथ तालुक्यात नोंदविण्यात आला. ठाणे शहरात दुपारपासून पावसाला सुरुवात झाली होती. अवघ्या काही तासांत वंदना सिनेमा, जांभळीनाका, घोडबंदर येथील पातलीपाडा, मानपाडा चौक, माजीवडा, नौपाडा येथील सखल भागात पाणी साचले.
पालघरमध्ये पुन्हा मुसळधार
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात उसंत घेतलेल्या पावसाने गुरुवारी दुपारी दमदार पुनरागमन केले. बहुतांश तालुक्यांमध्ये संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. मागील आठवडय़ात वसई, विरारमध्ये सलग तीन दिवस मुसळधार पाऊस झाला. पाणी जाण्याचे बंद झालेले मार्ग, खाडय़ांची अरुंद झालेली पात्रे यामुळे पाऊस थांबल्यानंतरही शहरातील पाणी ओसरले नव्हते. त्यात पुन्हा गुरूवारी पुन्हा पावसाने झोडपल्यामुळे चिंतेत भर पडली आहे.