मुंबई : मुंबई तसेच उपनगरांत बुधवारी सायंकाळपासून पावसाने जोर धरला असून गुरुवारीही पावसाची संततधार सुरूच होती. दरम्यान, मुंबईत आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.मुंबईसह राज्यातील काही भागात गुरुवारपासून पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत सोमवारी मुसळधार पाऊस कोसळला. त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. दरम्यान, मुंबईतील काही भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर शनिवारी मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी सकाळी ८:३० वाजेपर्यंत ८६ मिमी तर, सांताक्रूझ केंद्रात ११५.८ मिमी पावसाची नोंद झाली. तसेच भायखळा येथे १००.५ मिमी, माटुंगा ९९ मिमी, दहिसर ५७.५ मिमी , टाटा पावर चेंबूर ५८ मिमी, विक्रोळी ६५.५ मिमी पावसाची नोंद झाली.मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यानुसार कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.