मुंबई : मुंबई शहर, तसेच उपनगरांत सोमवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावली. शहर आणि उपनगरात दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. दरम्यान, मंगळवारी मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
हवामान विभागाने रविवारी पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार मुंबई शहर, उपनगर, ठाणे जिल्ह्यांत सोमवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. तसेच मुंबई शहर व उपनगरात मंगळवारी विशेषतः पहाटे २.३० ते ५.३० दरम्यान पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. गेल्या २४ तासांत हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात १०६.० मि.मी., तर सांताक्रूझ केंद्रात ११९.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वाऱ्याची चक्रिय स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस पाऊस सक्रिय राहील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत शुक्रवारपर्यंत अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सतर्कतेच्या सूचना
पुढील पाच दिवस प्रतिकूल हवामान असल्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. ताशी ४५ – ५५ किमी वेगाने वारा असण्याची शक्यता आहे. तसेच किनारी भागातदेखील जाऊ नये, असे इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा – “किरीट सोमय्या नागडे झाले, पेन ड्राईव्ह घेऊन सभागृहात…”, अंबादास दानवेंचा हल्लाबोल
अतिमुसळधार पावसाचा इशारा
रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांत सोमवारपासून शुक्रवारपर्यंत अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, पहाटेपासून नवी मुंबईत पावसाने पुन्हा जोर धरला आहे.