मुंबई : ऐन गणेशोत्सवात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसामुळे नागरिकांचे हाल झाले असून आता अनंत चतुर्दशीला हलका ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसांत मध्य भारत आणि महाराष्ट्रात पावसाची सक्रियता कमी होणार आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टी, कोकण भागात विसर्जनाच्या दिवशी गुरुवारी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या पूर्वानुमानानुसार पालघर, रायगड, रत्नागिरी आणि नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्य़ांतील घाटमाथ्यावर काही ठिकाणी बुधवारी मुसळधार पावसाची शक्यता दिसते. मात्र गुरुवारी विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असे हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान मंगळवारी दिवसभरात मुंबई आणि आसपासच्या परिसरात काही ठिकाणी २० ते ४० मिमी पावसाची नोंद झाली. किनारपट्टीवरदेखील पावसाचे प्रमाण मर्यादितच राहिले.

महाबळेश्वर येथे यावर्षीच्या मोसमात सरासरीपेक्षा सुमारे अडीच हजार मिमी अधिक पाऊस झाला. महाबळेश्वरचा मोसमातील सरासरी पाऊस हा ५,५३०.१ मिमी इतका आहे. मंगळवारपर्यंत संपूर्ण मोसमात ८०१२.१ मिमी पावसाची नोंद झाली. महाबळेश्वरात यावर्षी ऑगस्टच्या मध्यावरच उचांकी पावसाच्या नोंदी झाल्या आहेत. ऑगस्टमध्ये १९९२ पासूनच्या नोंदीनुसार ऑगस्ट महिन्यात एकूण सर्वाधिक पाऊस २००४ साली ३०९६.३ मिमी झाला होता. यावर्षी ऑगस्टच्या १६ तारखेपर्यंत ३००० मिमी पाऊस पडला आहे. ऑगस्टच्या सुरुवातीलाच महाबळेश्व्र येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे कृष्णा नदीला महापूर आला होता.

Story img Loader