मुंबई : मुंबईसह उपनगरांत गुरुवारीही ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातही हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. काही दिवसांपासून हवेतील वाढलेल्या आर्द्रतेमुळे उकाड्याची जाणीव होऊन मुंबईकर हैराण झाले आहेत. तापमानात घट झाली असली तरी उकाड्यामुळे अंगाची लाही होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह उपनगरांत ढगाळ वातावरण होते. काही भागात पहाटे पावसाचा शिडकावा देखील झाला.
हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात बुधवारी ३४.२ अंश सेल्सिअस तर, सांताक्रूझ केंद्रात ३६.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी कमाल तापमानात फारशी घट झाली नव्हती. दरम्यान, मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात गुरुवारीही हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यावेळी काही भागात पावसाचा शिडकावा होईल.
कोकणात गुरुवारी काही भागात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात उकाडा, ऊन आणि पाऊस अशी परिस्थिती दिसून येत आहे. पुढील चार दिवस राज्यातील काही भागामध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर काही भागात ढगाळ वातावरणामुळे उकाडा सहन करावा लागत आहे.
मध्य महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा
राज्यात वादळी पावसाचे वातावरण कायम आहे. काही भागात ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. तर, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गारपिटीचाही इशारा हवामान विभागाने दिला आहे.
उन्हाचा तडाखा एप्रिलमध्ये अधिक
यंदाच्या उन्हाळी हंगामात देशाच्या बहुतांश भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत उन्हाचा चटका तापदायक ठरणार असून, तीव्र उष्ण लाटा येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. एप्रिल महिन्यात महाराष्ट्र अधिक तापण्याची शक्यता आहे.