मुंबई : राज्यात सर्वत्र पावसाने उघडीप दिली आहे. जुलै अखेरीस कोसळलेल्या पावसाने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून विश्रांती घेतली आहे. मुंबईत अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पुन्हा एकदा उकाडा वाढला आहे. दरम्यान, पुढील काही दिवस मुंबई तसेच ठाणे, पालघर भागात हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
शहर तसेच उपनगरांत ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला काही भागात पाऊस झाला. मात्र, त्यानंतर पावसाची प्रतीक्षा कायम आहे. काही भागात अधूनमधून पाऊससरी कोसळत आहेत. परंतु ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात हवा तसा मुसळधार पाऊस पडलेला नाही. यामुळे मुंबईकरांना उकाडा सोसावा लागत आहे. दरम्यान, पुढील काही दिवस मुंबईत अशीच स्थिती कायम असणार आहे. मात्र काही भागात हलक्या सरी कोसळतील. या कालावधीत संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण राहील. काही भागात पाऊस होईल, तर काही भागात कोरडे वातावरण असेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हेही वाचा – लाडकं सरकार लक्षात ठेवा! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
वायव्य मध्य प्रदेश आणि शेजारील भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तसेच द्रोणीय स्थिती (मॉन्सून ट्रफ) आहे. याचाच परिणाम म्हणून राज्यात अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. तर काही भागात हलक्या सरी बरसत आहेत.