मुंबई : मुंबईसह ठाणे जिल्ह्यात बुधवारी तापमानात घट झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, हवेतील आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. दरम्यान, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात आज पावसाच्या हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअसदरम्यान असेल. मात्र हवेतील उष्मा कायम राहील, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.
गेले दोन दिवस कडक ऊन आणि उष्म्यामुळे मुंबईकर हैराण झाले होते. तापमानाचा पारा बुधवारी कमी झाल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला. दरम्यान, आज आणि उद्या तापमानात घट झाली तरी हवेतील उष्मा कायम राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
आर्द्रता अधिक असल्यामुळे मुंबईकरांना बुधवारी उष्मा सहन करावा लागला. मात्र, दुपारपर्यंत ढगाळ वातावरण असल्यामुळे उन्हाचा तडाखा कमी जाणवला. दरम्यान, आज मुंबई, ठाणे जिल्ह्यांसह सिंधुदुर्गमध्येही पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात वातावरणात अधिक आर्द्रता जाणवेल.