मुंबई: मागील काही दिवस मुंबईसह राज्यभरात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यातील बहुतांश भागात पाऊस पडत आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे, तसेच पालघर जिल्ह्यात पुढील दोन – तीन दिवस पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. ही प्रणाली वायव्येकडे जाताना आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. परिणामी, राज्यात पुढील दोन – तीन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. किनारपट्टी भागात पावसाचा जोर राहील, तसेच घाटमाथ्यावरही पावसाची शक्यता आहे. मुंबईत मागील सलग दोन दिवस पाऊस कोसळत आहे. यामुळे वातावरणातील गारवा वाढला आहे. तसेच कमाल तापमानात घट झाली आहे. मागील काही दिवस तापमानात सातत्याने वाढ होत होती. मात्र, मागील दोन – तीन दिवसांपासून तापमानात कमालीची घट झाली आहे. दिवसभर ढगाळ वातावरण आणि सायंकाळी पाऊस असे वातावरण सध्या मुंबईत आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शनिवारी ३२.५ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३३.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
हेही वाचा >>>वडाळ्यातील शाळेजवळ तीन विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्याविरोधात गुन्हा
दरम्यान, शहर आणि उपनगरांत सुरू असलेल्या पावसामुळे हवा दर्जा निर्देशांकात सुधारणा झाली आहे. काही भागात सातत्याने वाईट दर्जाची नोंद झाली होती. मात्र शनिवारी हवेचा दर्जा समाधानकारक होता. मुंबई आणि परिसरात मागील दोन दिवसांपासून पाऊस कोसळला. पावसामुळे मुंबईची हवा स्वच्छ झाली आहे. हवेचा दर्जा गुरुवारी समाधानकारक पातळीवर नोंदवला गेला. याचबरोबर शनिवारीही गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक होता.