लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : गेले काही दिवस मुंबईत ढगाळ वातावरण आहे. साधारण नोव्हेंबरमध्ये थंडीचे प्रमाण वाढण्यास सुरुवात होते. मात्र मुंबईत सकाळी फक्त हलकासा गारवा जाणवतो. मुंबई पहाटे काहीसा गारवा आणि दिवसभर ऊन असे वातावरण असते. दरम्यान, आठवड्याच्या शेवटी मुंबई, ठाणे, पालघर शहरांमध्ये ढगांच्या गडगडाटीसह पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
तामिळनाडूतील कन्याकुमारीपासून आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्याच्या किनारपट्टी जवळच्या परिसरापर्यंत बंगालच्या उपसागरात समुद्रसपाटीपासून तीन किलोमीटर उंचीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या हिवाळी मोसमी वारे आणि चक्रिय वाऱ्याची स्थिती यामुळे तामिळनाडू आणि केरळमध्ये सध्या पाऊस पडत आहे. दरम्यान, ही प्रणाली अरबी समुद्रात उतरून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीकडे आगेकूच करणार आहे.
आणखी वाचा- माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची ईडीकडून सुमारे सहा तास चौकशी
वायव्य तसेच उत्तर भारतात शनिवारी आदळणाऱ्या पश्चिमी झंजावाताचा परिणाम मध्य प्रदेश, गुजरात आणि उत्तर महाराष्ट्रात होणार आहे. मुंबईत काही ठिकाणी शनिवार आणि रविवार पाऊस पडण्याची, तसेच ढगाळ वातावरणाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळेल. तसेच मुंबईच्या हवा गुणवत्ता पातळीत आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे. मुंबईत कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. याआधी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसांत मुंबईमध्ये अवकाळी पाऊस झाला होता. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे पालघर शहरांत पाऊस पडणार असून किनारपट्टी भागातून पाऊस पुढे सरकण्याची शक्यता आहे.