मुंबई : राज्यात काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक त्रस्त आहेत. दरम्यान, हवामान विभागाने मुंबईसह इतर जिल्ह्यांत शुक्रवारी पावसाची शक्यता वर्तवली आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे. महाराष्ट्रासह मध्य भारतात २३ जूनपासून मान्सून सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने गुरुवारी वर्तवली. यानुसार २३ जूनपासून महाराष्ट्रासह मध्य भारतात मान्सून सुरू होण्यास पोषक वातावरण तयार होईल, अशी माहिती हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही भागात शुक्रवारी विजांसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, नाशिक, अहमदनगर, जालना, परभणी या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच सांगली, अमरावती, सोलापूर, अकोला, बुलढाणा, वर्धा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहिल. तसेच नागरिकांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागेल.
हेही वाचा >>>मुंबई लोकलमध्ये विद्यार्थिनीवर अत्याचार करणारा विकृतच; त्याच दिवशी आणखी पाच महिलांशीही केलं गैरवर्तन!
मुंबई आणि पुण्यात १८ ते २२ जूनदरम्यान मान्सून दाखल होऊ शकतो. मात्र राज्याच्या उत्तर भागात, तसेच विदर्भात मान्सून दाखल होण्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.