दहावी-बारावी परीक्षेकरिता उत्तरपत्रिकांच्या गुणपडताळणीबरोबरच पुनर्मुल्यांकनाची संधी देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. यानुसार वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी एक गुणाचा जरी बदल झाला तरी तो ग्राह्य़ धरला जाईल. विस्तारित (सब्जेक्टीव्ह) प्रश्नांच्या बाबतीत मात्र हा फरक पाच टक्क्य़ांहून अधिक असणे आवश्यक असणार आहे.
दहावी-बारावीसाठी आतापर्यंत केवळ गुणपडताळणीची संधी देण्यात येत होती. म्हणजे केवळ गुणांच्या बेरजेमध्ये फरक आढळून आल्यास तो दुरूस्त करून त्यानुसार सुधारित निकाल जाहीर केला जाई. गेल्या वर्षीपासून मागणी केल्यास उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या संधीचा फायदा घेत आपल्या गुणांविषयी शंका असलेल्या सुमारे १४ हजार विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांच्या फोटोकॉपी घेतल्या होत्या. यापैकी काही विद्यार्थ्यांनी उत्तर बरोबर असूनही गुण दिले गेले नसल्याची तक्रार मंडळाकडे केली होती. पण, नियमात गुणपडताळणीप्रमाणे पुनर्मुल्यांकनाची तरतूद नसल्याने मंडळांला या विद्यार्थ्यांना दिलासा देता आला नाही.
मंडळाच्या विभागीय अध्यक्षांच्या बैठकीत या तक्रारींचा आढावा घेतला असता फोटोकॉपीनंतर पुनर्मुल्यांकनाची संधी देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानुसार वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी एक गुणाचा जरी फरक आढळून आला तरी तो द्यावा असे ठरले. पण, वस्तुनिष्ठ प्रश्नांकरिता किती गुणांचा फरक ग्राह्य़ धरावा असा प्रश्न होता. मंडळाने तो १० टक्के गृहीत धरण्याचे मान्य करून तसा प्रस्ताव राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडे पाठविला. पण, सरकारने ही तफावत पाच टक्के करण्यात यावी, अशी सूचना मंडळाला केली. मंडळाने ही सूचना मान्य करून सुधारित प्रस्ताव सरकारकडे पाठविला.त्या त्या विषयाच्या मुख्य मॉडरेटरच्या अध्यक्षतेखालील समितीकडे पुनर्मुल्यांकनाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.
मंडळाच्या गुणपडताळणीत किंवा पुनर्मुल्यांकनात गुणांमध्ये बदल होण्याचे प्रमाण एक टक्केही नाही. पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज करण्याआधी उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी घ्यावी लागेल. फोटोकॉपीच्या आधारे विद्यार्थ्यांने आपल्या शाळेतील विषय शिक्षकाचे मत घेऊन मुख्याध्यापकांच्या संमतीने पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. त्यामुळे, उठसूठ पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज करण्याच्या प्रवृत्तीला आळा बसेल.
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना पुनर्मुल्यांकनाची संधी
दहावी-बारावी परीक्षेकरिता उत्तरपत्रिकांच्या गुणपडताळणीबरोबरच पुनर्मुल्यांकनाची संधी देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. यानुसार वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी एक गुणाचा जरी बदल झाला तरी तो ग्राह्य़ धरला जाईल.
First published on: 20-01-2013 at 04:37 IST
TOPICSपुनर्मूल्यांकन
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chance of revaluation of ten twelve student