मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीत संभाजीराजे हे अपक्ष म्हणून लढण्यावर ठाम असल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. महाविकास आघाडीने संभाजीराजे यांचा पराभव केला, असा बाहेर प्रचार करून मराठा समाजात  महाविकास आघाडीच्या विरोधात वातावरणनिर्मिती करण्यावर भाजपचा भर असेल. यातूनच संभाजीराजे यांचा भाजप वापर करून घेईल, अशी चिन्हे आहेत.  राज्यसभेसाठी खुल्या पद्धतीने मतदान होते. म्हणजेच पक्षाच्या अधिकृत प्रतिनिधीला दाखवूनच मतपत्रिका मतपेटीत टाकावी लागते. एखाद्या आमदाराने पक्षादेशाच्या विरोधात मतदान केल्यास आमदार म्हणून तो अपात्र ठरू शकतो. यातूनच मतांची फाटाफूट होण्याची शक्यता कमी असते. यापूर्वी राज्यात २००८ मध्ये राज्यसभेसाठी प्रत्यक्ष मतदान झाले होते. तेव्हा नारायण राणे यांच्याबरोबर असलेल्या शिवसेनेच्या चार बंडखोर आमदारांना आपली आमदारकी वाचविण्यासाठी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराला मतदान करावे लागले होते. संभाजीराजे हे निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर ठाम राहिल्यास १० जूनला प्रत्यक्ष मतदान होईल. भाजपकडे २२ अतिरिक्त मते असून, काही अपक्षांची भाजपला साथ आहे. ही मते संभाजीराजे यांना दिली जाऊ शकतात. अपक्ष व छोटय़ा पक्षांचा पाठिंबा मिळविण्यात संभाजीराजे किंवा भाजपला यश आले तरच भाजपला ४१.०१ मतांचा टप्पा गाठता येऊ शकतो. सध्या तरी ही शक्यता कमी दिसते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संभाजीराजेंची कोंडी करण्याचा प्रयत्न -फडणवीस

नागपूर : छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभा उमेदवारी देण्याबाबतचा विषय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुरू केला. त्यानंतर हा विषय वेगळय़ा दिशेने गेला. यातून संभाजीराजेंची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chances of being uncontested diminished bjp sambhaji raje rajya sabha ysh