मुंबई : कोकण, मध्य महाराष्ट्रात मोसमी वारे दाखल झाले आहेत. येथे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या भागात मोसमी वारे दाखल झाले असले तरी मुंबईत अजूनही वळीवाच्या पावसाचा अंदाज कायम आहे. दरम्यान, तीन – चार दिवस मुंबईसह ठाणे जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच सोमवार, मंगळवारी ठाणे, रायगड आणि रत्नागिरी भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईत उकाडा कायम असून, संपूर्ण दिवस ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात आणखी भर पडली. मुंबईतील कमाल तापमानात चढ – उतार सुरूच आहे. तापमानाचा पारा उतरला असला तरी उकाड्यामुळे नागरिक हैराण आहेत. दरम्यान, मुंबईत पुढील दोन – तीन दिवस ढगाळ वातावरणाबरोबरच पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवमान विभागाने मुंबईत शनिवारी वळीवाच्या पावसाची शक्यता वर्तवली होती. मात्र, मुंबईत दिवसभर कुठेही पाऊस पडला नाही. या उलट मुंबईकर उकाड्याने हैराण झाले. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शनिवारी ३४.८ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३६.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ केंद्रात शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी कमाल तापमान १ अंश सेल्सिअसने अधिक नोंदले गेले.
हेही वाचा : सलग दोन दिवस हिंगोली जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये बिघाड, शनिवारी दादर येथे २५ मिनिटे खोळंबा
दरम्यान, मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे मोसमी वारे पुढील दोन – तीन दिवसांत मुंबईत दाखल होण्याची शक्यता हवामान विभगाने वर्तवली आहे. तसेच राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामध्ये नाशिक, कोल्हापूर, सातारा, बीड, अकोला जिल्ह्यांचा समावेश आहे.
© The Indian Express (P) Ltd