भाजपा नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपात येण्याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. “उद्धव ठाकरे ‘रात गई, बात गई’ असं म्हणाले, तर एकत्र येता येईल,” असं मत चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंनी भाजपाबरोबर येण्याबाबत काही संकेत दिलेत का या प्रश्नाचंही उत्तर दिलं. ते शुक्रवारी (७ एप्रिल) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “उद्धव ठाकरेंकडून भाजपाबरोबर येण्याचे काहीही संकेत आलेले नाहीत. मी जसा भाजपाचा नेता आहे, तसाच एक माणूस आहे, महाराष्ट्राचा नागरिक आहे. घडणाऱ्या घटनांमुळे मी व्यथित होतो, त्यामुळे मी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वासाठी भाजपाबरोबर यावं असं म्हटलं. माझ्या पक्षात एवढं स्वातंत्र्य आहे. शरद पवारांच्या मागे गेल्याने पवारांनी अनेक नेत्यांची माती केली. तसेच ते पक्ष म्हणून उद्धव ठाकरेंची माती करतील.”
“उद्धव ठाकरे ‘रात गई, बात गई’ असं म्हणाले, तर…”
“देवेंद्र फडणवीसांचं मन किती मोठं आहे हे मला माहिती आहे. मात्र, काहीही बोलाल तर ते सहन करणार नाही. ‘हम किसी को टोकेंगे नही, किसीने टोका तो छोडेंगे भी नहीं’. आम्ही कुणालाही त्रास द्यायला जात नाही. उद्धव ठाकरे ‘रात गई, बात गई’ असं म्हणाले, तर एकत्र येता येईल. मात्र, ‘नही मेरा दरवाजा बंद हैं’ असं उद्धव ठाकरेंनी ३३ महिने केलं. त्यांनी एकदाही असं म्हटलं नाही की, तू घरी ये, आपण एकत्र बसू. देवेंद्र फडणवीस असे दरवाजे बंद करणारे नाहीत,” असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं.
“राजकारणात लवचिकता फार महत्त्वाची असते”
“राजकारणात लवचिकता फार महत्त्वाची असते. ताठरपणाने स्वतःचाही फायदा होत नाही, पक्षाचाही नाही आणि समाजाचाही फायदा होत नाही. उद्धव ठाकरेंनी म्हटलं पाहिजे की, त्या-त्या वेळी बोललो, त्यात मनापासून काही नाही. मात्र, ते काहीही बोलले तर ते आम्ही अजिबात सहन करणार नाही,” असा इशाराही चंद्रकांत पाटलांनी दिला.