महानगरपालिकांसह नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह होतील, अशी ग्वाही सत्ताधारी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी मंगळवारी दिली. मुंबईसह १४ महानगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षणाशिवाय प्रभागांची सोडत काढण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्याने राजकीय पक्ष आणि ओबीसी समाजात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, आघाडीच्या नेत्यांनी आरक्षणासाठी आवश्यक असलेला सांख्यिकी तपशील लवकरच उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र यानंतरही ओबीसी समाजाने आक्रमक होत भाजपाच्या नेतृत्वाखाली मंत्रावर मोर्चा काढला आहे.
यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. “सरकारने ओबीसी आरक्षणासोबतच निवडणुका होणार असल्याचे म्हटले असले तरी न्यायालयाने निवडणूक आयोगाला निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यास सांगितले आहे. पाच वर्षे ओबीसी समाजाला निवडणुकांमध्ये प्रतिनिधित्व मिळणार नाही याचा राग ओबीसी समाजामध्ये आहे. तो व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाज भाजपाच्या कार्यालयासमोर आला आहे. कारण त्यांचा देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे की तुम्हीच यातून काही मार्ग काढू शकता किंवा संघर्षासाठी तुम्हीच नेतृत्व करु शकता,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
“ओबीसी समाजाच्या मनात भावना आहे की त्यांची महाराष्ट्र सरकारने फसवणूक केली आहे. मध्य प्रदेश सरकारने ओबीसींचे राजकीय आरक्षण गेल्यानंतर ट्रिपल टेस्ट पूर्ण केली. महाराष्ट्र सरकारने हे केले नाही. याचा ओबीसी समाजात रोष आहे,” असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे ओबीसी आरक्षणावर बैठक घेणार आहेत असे पत्रकारांनी विचारल्यावर चंद्रकांत पाटील यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. “शरद पवारांची लोकांना गूळ दाखवण्याची, फसवण्याची मोठी परंपरा आहे. ओबीसी समाज आता त्यांच्या गूळ दाखवण्याला भीक घालणार नाही. ओबीसी समाज भडकला आहे. यांच्या हातात सरकार आहे आणि हे रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत. हे सगळे नाटक असून ओबीसी समाजाने हे सर्व ओळखले आहे,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.