पुण्यातील एका महिलेच्या सासरच्यांनी जादुटोणा करण्यासाठी तिचे हातपाय बांधून सुनेचं मासिक पाळीतील रक्त विकण्याचा अघोरी प्रकार केल्याची घटना घडली. या प्रकरणी पुणे पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे. यानंतर आता या घटनेवर राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली. ते शुक्रवारी (१० मार्च) मुंबईत विधिमंडळाबाहेर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “पुण्यात सासरच्या लोकांनी एका महिलेला मासिक पाळीच्या वेळी हातपाय बांधून अत्यंत विचित्र प्रकार केला. ते सार्वजनिकपणे बोलावंही वाटत नाही. विज्ञान युग असताना समाजात भयंकर अंधश्रद्धा वाढत चालली आहे. अंधश्रद्धेमुळे समाजात अशा भयानक गोष्टी घडत आहेत.”
“आरोपींविरोधात कडक कलमं लावण्याचे पोलिसांना निर्देश”
“या प्रकरणी मी पुणे पोलीस आयुक्तांशी बोललो. त्यानंतर ही घटना पुणे ग्रामीणमधील असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांशी बोललो. आरोपींविरोधात जेवढी कडक कलमं लावता येतील तेवढी कडक कलमं लावा, असे निर्देश दिले,” अशी माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली.
“असे प्रकार करताना कायद्याची भीती वाटत नाही”
“असे प्रकार करताना कायद्याची जी भीती वाटली पाहिजे ती त्यांना वाटत नाही. त्यांना कायद्याची भीती वाटली पाहिजे. पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कर्तव्यदक्ष आणि संवेदनशील आहेत. त्यामुळे दिवसभरात बऱ्याच गोष्टी घडतील,” असंही चंद्रकांत पाटलांनी नमूद केलं.
नेमकं प्रकरण काय?
मासिक पाळी सुरू असताना महिलेचा छळ करून अघोरी कृत्य केल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी पतीसह सात जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार पती सागर ढवळे, सासू अनिता ढवळे, सासरे बाबासाहेब ढवळे, दीर दीपक ढवळे, मावस दीर विशाल तुपे, भाचा रोहन मिसाळ, महादू कणसे (सर्व रा. बीड) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींच्या विरुद्ध अनैसर्गिक कृत्य, विनयभंग, शारिरिक मानसिक छळ तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा जादुटोणा प्रतिबंधक अधिनियम आदी कलमांनुसार गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार २७ वर्षीय महिला विश्रांतवाडी भागात राहते.
हेही वाचा : “पिंडीवर बर्फ झाल्याचा बनाव करणाऱ्यांविरोधात जादुटोणा विरोधी कायद्याची कलमं लावा”, अंनिसची मागणी
विवाहानंतर ती बीड जिल्ह्यातील कामखेडा गावात पतीच्या घरी राहत होती. पतीसह नातेवाईकांनी तिचा शारिरिक आणि मानसिक छळ केला. मासिक पाळी दरम्यान आरोपींनी संगनमत करुन महिलेशी अघोरी कृत्य केले, असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. छळामुळे महिला माहेरी निघून आली. त्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मगदूम तपास करत आहेत.