चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळात दुसरे स्थान

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय असलेले अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना धक्का देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांची विधान परिषद सभागृह नेतेपदी नियुक्ती केली. अध्यक्ष अमित शहा यांचे विश्वासू असलेल्या पाटील यांनी ज्येष्ठ असलेल्या मुनगंटीवार यांना मागे टाकले असून महसूल खात्याबरोबरच मंत्रिमंडळात दुसरे स्थानही मिळवले आहे.

एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर महसूल खाते पाटील यांच्याकडे राहील. मंत्रिमंडळातील दुसरे स्थान मुनगंटीवार यांना दिले जाईल, तर विधान परिषद सभागृह नेतेपदी तावडे यांची नियुक्ती करण्यात येईल, असे नियोजन करण्यात आले होते; पण दिल्लीतील धक्कातंत्राचा वापर करीत मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी त्यात गुरुवारी अचानक बदल केला आणि विधान परिषद सभागृहाच्या नेतेपदाची धुरा पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली. त्यांना खडसे यांच्याप्रमाणे मंत्रिमंडळातील दुसरे स्थानही देण्यात आले असून महसूल खात्याची जबाबदारीही सोपविली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

मुनगंटीवार यांनी आपल्याला महसूल मंत्रिपदात रस नसल्याचे व आपण कोणत्याही स्पर्धेत नसल्याचे सांगितलेही होते; पण प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या मुनगंटीवार यांना विधान परिषद सभागृह नेतेपद किंवा मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचे स्थानही देण्यात आलेले नाही. तावडे यांचा तर त्यासाठी विचारही झालेला नाही. तावडे यांच्याबाबत पक्षश्रेष्ठी फारसे अनुकूल नसल्याचे समजते. पक्षाध्यक्षांकडून आलेल्या सूचनेनुसार पाटील यांची सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्यात आली.

कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातील नेते असून मराठा समाजातील आहेत. अमित शहा यांच्याबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्याचे निकटचे संबंध आहेत.  त्यामुळे सभागृह नेतेपद आणि मंत्रिमंडळात दुसरे स्थान मिळविले, असे सूत्रांनी सांगितले.

सुभाष देशमुखांना सहकार, फुंडकरांकडे कृषी शक्य

नवीन खातेवाटप शनिवारी जाहीर केले जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. चंद्रकांत पाटील यांच्याकडे महसूल खात्याची जबाबदारी सोपविली जाणार असून सार्वजनिक बांधकाम खातेही कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे. सहकार खाते सुभाष देशमुख यांच्याकडे, तर कृषी व फलोत्पादन खात्याची जबाबदारी पांडुरंग फुंडकरांकडे सोपविली जाईल, अशी चिन्हे आहेत.

  • देशमुख त्यांच्याकडे सहकार खाते दिले जाईल, असा अंदाज आहे. विनोद तावडे यांचे वैद्यकीय शिक्षण खाते गिरीश महाजन यांच्याकडे सोपविले जाईल.
  • तावडे यांच्याकडे असलेले क्रीडा व युवक कल्याण, तर मुख्यमंत्र्यांकडची रोजगार व स्वयंरोजगार, माजी सैनिक कल्याण, पर्यटन ही खाती जयकुमार रावळ यांच्याकडे सोपविली जातील. राम शिंदे यांच्याकडे उत्पादन शुल्क, मदत व पुनर्वसन, अल्पसंख्याक, तर महादेव जानकर यांच्याकडे पशुसंवर्धन व दुग्धविकास, मत्स्य व्यवसाय ही खाती सोपवण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

Story img Loader