मुंबई : विधि तीन वर्ष अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा आणि मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या सत्र ६ ची परीक्षा एकाच वेळी होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत विधि तीन वर्ष अभ्यासक्रमाची २० व २१ मार्च रोजी होणारी प्रवेश परीक्षा ३ व ४ मे रोजी घेण्याचा निर्णय राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने घेतला आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
विधि तीन वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेच्या अर्ज नोंदणीला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे नुकतेच राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने विधि तीन वर्ष अभ्यासक्रमाच्या अर्ज नोंदणीसाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार विधि तीन वर्ष अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा २० व २१ मार्च रोजी घेण्यात येणार होती. ही परीक्षा राज्यातील, तसेच राज्याबाहेरील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. मात्र मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या सत्र ६ ची परीक्षा त्याच कालावधीत होणार आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडे केली होती. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन विधि तीन वर्ष अभ्यासक्रमाची २० व २१ मार्च रोजी होणारी प्रवेश परीक्षा ३ व ४ मे रोजी घेण्याचा निर्णय राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने घेतला. यामुळे विधि अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
विधि तीन वर्षे अभ्यासक्रमाच्या अर्ज नोंदणी प्रक्रियेला २७ डिसेंबरपासून सुरुवात झाली होती. त्यानंतर २८ जानेवारी रोजी आणि १३ फेब्रुवारीपासून अर्ज नाेंदणी करण्यास मुदतवाढ देण्यात आली. आतापर्यंत विधि तीन वर्षे अभ्यासक्रमासाठी ८६ हजार ८५६ विद्यार्थ्यांनी अर्ज नाेंदणी केली. त्यापैकी ६५ हजार ९७ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चिती केली आहे. तर २१ हजार ७५९ विद्यार्थ्यांचे अर्ज प्रक्रियेमध्ये आहेत. विधि तीन वर्षे आणि बीएड अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा मिळत असलेला प्रतिसाद आणि २१ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी शुल्क भरले नसल्याने विधि अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज नोंदणी करण्यास २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र यापुढे अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली जाणार नसल्याचेही सीईटी कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.