मुंबई : आशियातील सर्वात मोठ्या झोपडीपट्टीचा, धारावीचा कायापालट धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत करण्यात येणार आहे. या पुनर्विकासासाठी राज्य सरकार आणि अदानी समुह यांच्या संयुक्त भागीदारीत धारावी रिडेव्हलमेन्ट प्रायव्हेट लिमिटेड (डीआरपीपीएल) नावाची कंपनी स्थापन करण्यात आली आहे. मात्र आता अचानक या कंपनीचे नाव बदलण्यात आले आहे. डीआरपीपीएलऐवजी आता या कंपनीचे नाव एनएमडीपीएल करण्यात आले आहे. १२ डिसेंबर रोजी डीआरपीपीएलच्या संचालक मंडळाच्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तर १७ डिसेंबरपासून डीआरपीपीएलचे नाव नवभारत मेगा डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेड (एनएमडीपीएल) असे झाले आहे.
धारावी पुनर्विकासाच्या निविदा प्रक्रियेत अदानी समुहाने बाजी मारली आहे. त्यानुसार अदानी समुहाकडून धारावीचा पुनर्विकास केला जात आहे. या पुनर्विकासाअंतर्गत सध्या धारावीतील बांधकामांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यानंतर रहिवाशांची पात्रता निश्चिती केली जाणार आहे. लवकरच या प्रकल्पाला वेग दिला जाण्याची शक्यता आहे. अशा या पुनर्विकासासाठी महाराष्ट्र राज्य सरकार आणि अदानी समूह यांच्या संयुक्त भागीदारीने धारावी रिडेव्हपलमेन्ट प्रायव्हेट लिमिटेड अर्थात डीआरपीपीएल नावाने कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. या कंपनीत अदानी समुहाचा ८० टक्के तर राज्य सरकारचा २० टक्के हिस्सा आहे. या कंपनीवर धारावी पुनर्विकासाची संपूर्ण जबाबादारी आहे. त्यानुसार या कंपनीच्या माध्यमातूनच सध्या धारावीत सर्वेक्षणासह अन्य कामे केली जात आहेत.
असे असताना आता अचानक डीआरपीपीएलचे नाव बदलण्यात आले आहे. डीआरपीपीएलऐवजी एनएमडीपीएल असे नाव आता कंपनीस देण्यात आले आहे. अदानी समुहातील सूत्रांनी यास दुजोरा दिला आहे. नवभारत मेगा डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच एनएमडीपीएल अशी आता या कंपनीची नवी ओळख १७ डिसेंबरपासून लागू झाली आहे. एनएमडीपीएलकडून डीआरपीपीएलच्या सर्व संचालकांना कळविण्यात आले आहे. एनएमडीपीएल ही नवीन कंपनी नसून अदानी समुहाची यापूर्वीचीच २३ ऑगस्ट २०२३ ची जूनी कंपनी आहे. दरम्यान १७ डिसेंबरला नाव बदलण्यात आले असताना डीआरपीपीएल, धारावी पुनर्विकास प्रकल्प (डीआरपी) वा राज्य सरकार कोणाकडूनही यासंबंधीची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. ही बाब गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. धारावी बचाव आंदोलनाने अखेर ही माहिती समोर आणली आहे.
आणखी वाचा-कुर्ल्यात भंगार गोदामांना भीषण आग
अदानीची सर्वच कामे गुपचूप गुपचूप
अदानी समुहाकडून सर्व कामात गुप्तता राखली जाते. मग ते सर्वेक्षण असो किंवा मुंबईतील जागेची मागणी असो. धारावी पुनर्विकासाचे भूमिपूजनही अदानीने असेच गुपचूप केले होते. आता त्याप्रमाणेच अचानक आणि कोणाालाही थांगपत्ता लागू न देता कंपनीचे नाव बदलले आहे. असे उद्या अदानी धारावीकरांचा पत्ताही बदलणार आहे. धारावीच्या बाहेरचा धारावीकरांचा पत्ता यानंतर असला तर आश्चर्य वाटायला नको. हा सगळा गोंधळ, गैरप्रकार पाहता धारावीकरांनी सावध होत अदानीविरोधातील लढा आणखी तीव्र करण्याची गरज आहे. त्यानुसार लढा तीव्र केला जाईल. -अॅड राजेंद्र कोरडे, समन्वयक, धारावी बचाव आंदोलन