मुंबई: कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेतील आरे ते बीकेसी मार्गिकेवरील मेट्रो सेवेच्या वेळेत सोमवारी, रमजान ईदच्या दिवशी मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनकडून (एमएमआरसी) बदल करण्यात आला आहे. दररोज आरे ते बीकेसी मार्गिकेवरील सेवा सकाळी ६.३० वाजता सुरु होते.मात्र सोमवारी, रमजान ईदच्या दिवशी पहिली मेट्रो गाडी सकाळी ८.३० वाजता सुटणार असल्याची माहिती एमएमआरसीकडून देण्यात आली आहे.

आरे ते बीकेसी मार्गिका आॅक्टोबर २०२४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाली आहे. या मार्गिकेवरील गाड्यांच्या वेळापत्रकानुसार सोमवार ते शनिवार या कालावधीत सकाळी ६.३० ते रात्री १०.३० या वेळेत मेट्रो सेवा कार्यरत असते. तर रविवारी, सुट्टीच्या दिवशी मेट्रो सेवा सकाळी ८.३० ते रात्री १०.३० या वेळेत मेट्रोची सेवा सुरु असते. पण सोमवारी, ३१ मार्चला, रमजान ईदच्या दिवशी मात्र मेट्रोच्या सेवा वेळेत एमएमआरसीने बदल केला आहे. एमएमआरसीने एक्स या समाज माध्यमावरुन दिलेल्या माहितीनुसार सोमवारी मेट्रो ३ मार्गिकेवरील आरे ते बीकेसीदरम्यानची मेट्रो सेवा सकाळी ६.३० वाजण्याऐवजी सकाळी ८.३० वाजल्यापासून सुरु होणार आहे.

मेट्रो ३ च्या संचलनाशी संबंधित नियोजनासाठी सोमवारी मेट्रो सेवा काळात बदल करण्यात आल्याचेही एमएमआरसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मेट्रो ३ च्या सेवा वेळेत कपात करण्यात आल्याने त्याबद्दल एमएमआरसीकडून दिलगिरीही व्यक्त करण्यात आली आहे. त्याचवेळी प्रवाशांनी प्रवासाचे योग्य ते नियोजन करत मेट्रो ३ चा प्रवास करावा असे आवाहनही एमएमआरसीकडून करण्यात आले आहे. दरम्यान मंगळवारपासून मेट्रो ३ मार्गिकेवरील आरे ते बीकेसी दरम्यान मेट्रो गाड्या नियोजित वेळापत्रकानुसार धावणार आहेत.