प्रवाशांच्या ‘थंड’ प्रतिसादामुळे बेस्टचा निर्णय
प्रवाशांकडून मिळत असलेला अत्यल्प प्रतिसाद, तसेच वाढता खर्च यामुळे बेस्ट उपक्रमाला आपल्या नऊ वातानुकूलीत बसगाडय़ांच्या मार्गत फेरबदल करणे भाग पडले आहे.
सध्या आर्थिक स्थिती नाजूक असलेल्या बेस्ट उपक्रमाचा तोटा वातानुकूलीत बसगाडय़ांमुळे वाढत आहे. या बसगाडय़ांवर केल्या जाणाऱ्या खर्चाच्या निम्मी रक्कमही त्यातून वसूल होत नाही. त्यामुळे अलिकडेच चार वातानुकूलीत बसगाडय़ा बंद करण्याचा निर्णय बेस्टने घेतला होता. आता नऊ बसगाडय़ांच्या मार्गात फेरबदल करण्यात आले आहेत.
बॅकबे आगार आणि दहिसर बस स्थानकादरम्यान धावणाऱ्या बसमार्ग क्रमांक एएस-२ चे प्रवर्तन बॅकबे आगारोवजी नेहरू तारांगण येथेच समाप्त करण्यात येणार आहे. मात्र ही बसगाडी दहिसर बस स्थानकाऐवजी मिरारोड रेल्वे स्थानकापर्यंत धावणार आहे. दुपारी ही बसगाडी नेहरू तारांगण आमि मागठाणे आगारापुरती मर्यादित राहील. नेहरू तारांगण आणि मिरारोड रेल्वे स्थानक (पूर्व) दरम्यान धावणारी बस मंत्रालयापर्यंत सोडण्यात येणार आहे. तसेच वत्सलाबाी देसाई चौक आणि मुंबई सेंट्रल आगार दरम्यानचे प्रवर्तन रद्द करण्यात येणार आहे. माहीम बस स्थानक आणि कॅडबरी जंक्शन (ठाणे) दरम्यान धावणारी बस क्रमांक एएस-३०२ यापुढे घाटकोपर आगार ते कॅडबरी जंक्शन अशी असेल. वडाळा आगार ते कळंबोली दरम्यान धावणारी बस क्रमांक एएस-५०३ दुपारच्या वेळी सीबीडी-बेलापूर बस स्थानकापर्यंतच जाईल. बस क्रमांक एएस ५०५ केवळ वांद्रे बस स्थानक ते वाशी बस स्थानक अशी धावणार आहे. बस क्रमांक एएस-५२४ बोरिवली स्थानक (पूर्व) आणि एपीएमसी सेट्टर-१९ दरम्यान धावणार असून गांधीनगर आणि बाशी बसस्थानकादरम्यान मानखुर्द मार्गे असलेले प्रवर्तन ऐरोली, ठाणे-बेलापूर मार्गे असेल. दिंडोशी बस स्थानक आणि एल अॅण्ड टी इन्फोटेक – महापे दरम्यान धावणारी बस क्रमांक एएस-५२५ मिलेनिअम बिझनेस पार्कपर्यंतच जाणार असून ती केवळ सकाळी आणि सायंकाळी सोडण्यात येईल. वसंतराव नाईक चौक (ताडदेव) ते एल अॅण्ड टी इन्फोटेक- महापे दरम्यान धावणारी बस क्रमांक एएस-५९२ केवळ सकाळी आणि सायंकाळी सोडण्यात येणार आहे. बस क्रमांक एएस-७०७ केवळ सातबंगला बस स्थानक ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, भाईंदर अशी धावणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा