ठाण्यातील धोकादायक आणि बेकायदा इमारतींच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजनेला मंजुरी मिळावी या मागणीसाठी शुक्रवारपासून सुरू झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोघा खासदारांचे उपोषण आणखी लांबण्याची चिन्हे असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा रविवारी आयोजित करण्यात आलेला ठाणे दौरा रद्द झाल्याने राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. पक्षीय कार्यक्रमाचे निमित्त साधून मुख्यमंत्री ठाण्यातील काही धोकादायक इमारतींची पहाणी करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. तसेच त्यांचा मुंब्रा परिसराचा धावता दौरा घडवून आणण्याचे बेतही आखले जात होते.
ठाणे, कळवा, मुंब्रा या शहरांमधील धोकादायक इमारतींचा मुद्दा तापू लागला असून या प्रश्नावर सर्वच राजकीय पक्षांमध्ये श्रेयाची लढाई सुरु झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. गुरुवारी या प्रश्नाचे निवेदन घेऊन शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. शिवसेनेच्या मोर्चानंतर राष्ट्रवादीने शुक्रवारपासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे. गुरुवारी याच प्रश्नावर  ठाण्यातील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांचा ठाणे दौरा ठरला आणि मुख्यमंत्र्यांनी जीर्ण झालेल्या काही इमारतींची स्वत पहाणी करावी, असेही ठरले.
मोठय़ा जोशात ठाण्यात परतलेल्या काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या ठाणे दौऱ्याचा कार्यक्रमही जाहीर करुन टाकला. हा प्रश्न लवकरच निकाली निघेल, याची जाणीव शहरातील सर्वच राजकीय पक्षांना झाली आहे. त्यामुळे कळवा-मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रश्नावर संजीव नाईक आणि आनंद परांजपे या पक्षाच्या दोन खासदारांना उपोषणासाठी बसविले आहे. मुख्यमंत्री जोपर्यत क्लस्टरची अधिकृत घोषणा करत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे. रविवारी ठाण्यात येणारे मुख्यमंत्री क्लस्टरसंबंधी ठोस घोषणार करतील, अशी आशा राष्ट्रवादीच्या नेत्यांना होती. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर उपोषणाला थांबविण्याचे बेतही आखले जात होते. मात्र, मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याने राष्ट्रवादीच्या गोटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे.

Story img Loader