कांदिवली येथील पोयसर नदीच्या रुंदीकरणासाठी अवर लेडी ऑफ अझम्शन चर्चच्या सेंट जोसेफ हायस्कूलच्या मैदानाची जागा रिकामी करण्यासाठी महापालिकेने नोटीस बजावली आहे. मात्र चर्च आणि शाळेने जागा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. तसेच याच्या निषेधार्थ १ डिसेंबर रोजी मोर्चा काढण्याचा इशारा ‘सेव्ह अवर लॅण्ड कमिटी’ने दिला आहे.
पावसाळ्यात पोयसर नदीमुळे काही सखल भाग जलमय होतो. त्यामुळे नदीचे रुंदीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. चर्चजवळील नाल्याची रुंदी ३६ मीटर असून ती ३७.५ मीटर करण्यात येणार आहे. रुंदीकरणात सेंट जोसेफ हायस्कूलच्या मैदानाचा व ख्रिस्ती दफनभूमीचा काही भागही येतो. त्यामुळे आवश्यक जागा रिकामी करण्याची नोटीस शाळा व चर्चला पाठविली. मात्र जागा रिकामी करण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे.
सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये १७०० विद्यार्थी शिक्षण घेत असून खेळण्यासाठी ते मैदानाचा वापर करतात. मात्र नदीच्या रुंदीकरणासाठी मैदानाचा लचका तोडला तर विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी जागाच राहणार नाही. नदीची खोली वाढविल्यास प्रश्न सुटणार आहे. मग पालिका रुंदीकरणाचा घाट का घालत आहे, असा सवाल ‘सेव्ह अवर लॅण्ड कमिटी’चे डॉल्फी डिसोजा यांनी केला आहे. महापालिकेने नोटीस रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच पालिकेच्या निषेधार्थ १ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता डहाणूकर वाडी येथे मोर्चा काढण्यात येणार आहे.    

Story img Loader