मुंबई : जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सदिच्छा साने हिच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेने १,७९० पानांचे आरोपपत्र मंगळवारी मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात दाखल केले. याप्रकरणी सुमारे १२५ जणांची साक्ष नोंदवण्यात आली असून त्यातील चार प्रमुख साक्षीदारांची साक्ष महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवण्यात आली आहे. याप्रकरणी मिथ्थू सिंह आणि त्याचा मित्र जब्बार अन्सारी या दोघांना अटक करण्यात आली असून ते तुरुंगात आहेत.
मिथ्थू सिंह वांद्रे परिसरात चायनीज खाद्यपदार्थाची विक्री करायचा. सदिच्छा आणि मिथ्थू हे २९ नोव्हेंबर २०२१ ला रात्री बँडस्टँडवर एकत्र दिसले होते. त्यानंतर ती बेपत्ता झाली. त्या दोघांना शेवटी एकत्र पाहणारे हॉटेलच्या दोन सुरक्षारक्षकांचे व मिथ्थूच्या चायनीज स्टॉलवर काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांचे जबाब सीआरपीसी कलम १६४ अंतर्गत महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवण्यात आले आहेत. या जबाबांचाही आरोपपत्रात समावेश आहे. याशिवाय दोन्ही आरोपींमधील संभाषण सुरू असताना साक्षीदाराने ऐकले होते. त्यात ते सदिच्छा सानेबाबत चर्चा करत होते. याशिवाय आरोपीने सदिच्छा सानेचा मोबाइल ऐरोप्लेन मोडवर असतानाही जाणूनबुजून सदिच्छाला १३ मिसकॉल केले होते. तसेच तिला समाजमाध्यमांवर मैत्रीसाठी विनंती केली होती. मिथ्थूने स्वत:ला वाचवण्यासाठी या सर्व गोष्टींचे स्क्रीनशॉर्ट काढून घेतले होते, असे अनेक वस्तुनिष्ठ पुरावे मिळाले आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. सदिच्छा बेपत्ता झाल्याच्या रात्री बँडस्टँडवर ती आणि मिथ्थू यांनी एकत्र छायाचित्र घेतले होते. तसेच मिथ्थूसारखी दिसणारी एक व्यक्ती टय़ूब फ्लोटसह बँडस्टँडकडे घाईघाईने चालत गेल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांना सापडले आहे. पोलिसांना अद्याप सदिच्छा साने हिचा मृतदेह सापडलेला नाही. मिथ्थू सिंहच्या निवासस्थानातून सापडलेल्या फ्लोट टय़ूबवर आढळलेले रक्ताचे नमुने सदिच्छा सानेचे नसल्याचेही स्पष्ट झाले होते.