मुंबई : करोना केंद्र गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेन्टचे भागिदार सुजीत पाटकरसह सहा जणांविरोधात विशेष न्यायालयात शुक्रवारी आरोपपत्र दाखल केले. ७५ पानांचे हे आरोपपत्र असून त्यात बनावट कागदपत्र करून सुमारे ३२ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.
सुजीत पाटकर, डॉ. हेमंत गुप्ता, संजय शाह, राजीव साळुंखे, डॉ. किशोर बिसुरे, लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेन्ट सर्विस कंपनी व डॉ. अरविंद सिंह यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. ईडीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनएससीआय वरळी व दहिसर येथे डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी पुरवण्याचे कंत्राट लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेन्ट सर्विस कंपनीला मिळाले होते. त्याबाबत कंपनीकडून महापालिकेला सादर केलेला हजेरीपट व कागदपत्रे बनावट असल्याचे ईडीला तपासात निदर्शनास आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करोना केंद्रांवर कमी वैद्यकीय कर्मचारी कार्यरत असतानाही बनावट कागदपत्रे तयार करून वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या फुगवण्यात आली. हा सर्व प्रकार सुजीत पाटकर यांच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले.
हेही वाचा >>> महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांच्याकडून संभाजी भिडेंविरुद्ध न्यायालयात दावा
कंपनीला कंत्राट मिळवून देण्यातही पाटकरची महत्त्वाची भूमिका होती. त्याने डॉ. बिसुरे व इतर महानगरपालिका अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या जेवणाच्या खर्चाबाबची कागदपत्रेही महानगरपालिकेला सुपूर्द केली. लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेन्ट कंपनी स्थापन करताना पाटकरने केवळ १२ हजार ५०० रुपयांची गुंतवणूक केली होती. पण या गैरप्रकारातून मिळालेली मोठी रक्कम पाटकरच्या बँक खात्यावर जमा झाल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले होते. त्यानंतर ईडीने पाटकर व डॉ. बिसुरे यांना याप्रकरणी अटक केली होती. लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेन्ट सर्विसला जम्बो करोना केंद्राच्या कंत्राटाचे ३१ कोटी ८४ लाख ७१ हजार ६३४ रुपये महापालिकेकडून मिळाले होते. ती रक्कम कोणापर्यंत पोहोचली, याबाबत ईडी तपास करीत आहे. याप्रकरणी कोणत्याही मालमत्तेवर अद्याप टाच आणण्यात आलेली नाही. आम्ही काही संशयीत मालमत्तांची माहिती मिळवली आहे. त्यांच्यावर टाच आणण्याची प्रक्रिया लवकरच सुरूवात करण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.