उपपोलीस महानिरीक्षक सुनील पारसकर यांच्यावर मॉडेलवरील कथित बलात्कारप्रकरणी मंगळवारी बोरिवली महानगरदंडाधिकाऱ्यांसमोर आरोपपत्र दाखल करण्यात आले. पारसकर यांच्यावरील आरोप गंभीर स्वरूपाचा असल्याने आरोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर कायद्यानुसार महानगरदंडाधिकाऱ्यांनी प्रकरण सत्र न्यायालयाकडे वर्ग केले. सत्र न्यायालयात या प्रकरणी १२ जून रोजी सुनावणी होणार असून त्या वेळेस पारसकर यांना हजर राहावे लागणार आहे.
पारसरकर यांच्यावर ७२४ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून त्यात संबंधित मॉडेलच्या महानगरदंडाधिकाऱ्यांसमोरील जबाबासह ५८ साक्षीदारांच्या जबाबाचा समावेश आहे. याशिवाय पारसकर हे त्यांना देण्यात आलेल्या कार्यालयीन गाडीने कुठे जायचे याचा तपशील ठेवणारी त्यांच्या चालकाची नोंदवहीचा समावेशही आरोपपत्रात आहे.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात संबंधित मॉडेलने मालवणी पोलीस ठाण्यात पारसकर यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार नोंदवली होती. त्याआधारे पारसकर यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पारसकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. सत्र न्यायालयानेही त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करताना संबंधित मॉडेलच्या वर्तणुकीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. संबंधित मॉडेलचे कथित गुन्ह्य़ानंतरही पारसकर यांच्यासोबतचे संबंध सर्वसाधारण होते.

Story img Loader